भोर: पावसाळ्यामध्ये भाेर-महाड रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाड-पंढरपूर या रस्त्याचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, भोर हद्दीतील ५९ किमी लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ३१० कोटींचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
पुण्याहून कोकणामध्ये जाण्यासाठी भोर-महाड हा जवळचा मार्ग आहे. दर वर्षी या भागामध्ये सुमारे तीन हजार ते साडेतीन हजार मिमी एवढा प्रचंड पाऊस पडत असतो. भोर तालुका हा दुर्गम व अतिवृष्टीचा असल्याने पावसाळा कालावधीमध्ये या भागात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ता बंद पडण्याच्या घटना दर वर्षी होत असतात. त्यामुळे या रस्त्यास दरडी प्रतिबंधक उपाय योजना करणे, रस्त्यास संरक्षक भिंत बांधणे व रस्तारुंदीकरण करणे आदी बाबींचा अंदाजपत्रकामध्ये समावेश करण्यात आला आहे. या रस्त्यावरील पर्यटनस्थळांचा, तसेच वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेऊन आमदार संग्राम थोपटे यांच्याकडून रस्त्यास निधी उपलब्ध होणेकामी शासनाकडे वारंवार पत्र व्यवहार करण्यात आला होता व त्याचा पाठपुरावा करून सदर रस्त्यास मंजुरी मिळवण्याचे अतिशय महत्त्वाचे काम केले आहे.
रस्त्याच्या मंजूर कामामध्ये आवश्यक त्या दरडी प्रतिबंधक उपाययोजना करणे, रस्त्यास संरक्षण भिंत बांधणे, रस्तारुंदीकरण करणे व गटाराची कामे करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या मंजुरीमुळे भोर तालुक्यातील महाड-भोर -पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५-डीडी या रस्त्यावरील वाहतुकीतील अडथळे दूर होऊन भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी होणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. भोर तालुक्यातील उर्वरित रस्त्यांसाठी अर्थसंकल्प व नाबार्डमधून निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.