पुणे :हडपसररेल्वेस्थानकाचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत खासदार बापट यांनी मंगळवारी लोकसभेत कलम ३७७ अन्वये मुद्दा उपस्थित करून केंद्र शासनाचे लक्ष वेधले.
गेल्या काही वर्षात प्रवाशांची आणि गाड्यांची संख्या लक्षणीय वाढत असल्याने, पुणेरेल्वेस्थानकावरून नवीन गाड्या धावणे शक्य होत नाही. त्यामुळे पुणे स्टेशनऐवजी हडपसरसारख्या पर्यायी स्टेशनवरून गाड्या सुरू करणे आवश्यक आहे. पुणे जंक्शनवरून लांब पल्ल्याच्या १५० गाड्या धावतात. यापैकी काही गाड्या हडपसर येथून सोडल्यास पुणे जंक्शनवरील भार कमी होईल.
पुणे रेल्वेस्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे काही गाड्या हडपसरला हलवत आहे. सध्या हडपसर ते हैदराबाद ही विशेष ट्रेन हडपसर रेल्वेस्थानकावरून धावते. परंतु हडपसर रेल्वेस्थानकावर चार फलाट असून, प्रवाशांसाठी एक फूट ओव्हरब्रिज आहे. त्यामुळे हडपसर रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कलम ३७७ अन्वये मुद्दा उपस्थित करून केल्याचे बापट यांनी सांगितले.