पिंपरी : एचए स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वनवासी कल्याणाश्रमासाठी अडीच लाख रुपयांचा निधी संकलीत केला.आदिवासी समाजाचे शहरी समाजाशी आपुलकीचे नाते व्हावे, त्यांच्यातील मानसिक दुरावा नाहीसा व्हावा, आधार मानून वनवासी कल्याण आश्रमासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या सप्ताहात शालेय विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी निधी संकलनास सुरुवात करून आठ दिवसांत २ लाख ५० हजार एवढा निधी उभारला. विद्यार्थ्यांना समारंभात निधी संकलनाची रीत समजावून सांगण्यात आली. मुलींसाठी निधी संकलनाची आचारसंहिता घालून देण्यात आली. योग्य ती शाब्दिक, भाषिक कौशल्ये वापरून वनवासी कल्याण आश्रमाची ज्ञात माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात विद्यार्थी कुशलतेने यशस्वी झाले. दैनंदिन अभ्यास सांभाळून विद्यार्थ्यांनी सकाळ-संध्याकाळी एक तास आपले नातेवाईक, शेजारी-पाजारी, व्यवहारी इत्यादी लोकांकडून पाच, दहा, पन्नासच्या पटीत मुलांनी निधी संकलन केले. पाचवी (क) या वर्गाने सर्वांत जास्त २६ हजार निधी उभा केला. याच वर्गातील तनाज सलीम सय्यद या विद्यार्थिनीने २६०० रुपये एवढी सर्वांत जास्त रक्कम उभी केली. सोमवारी शाळेच्या प्रांगणात वनवासी कल्याणाश्रमाच्या पिंपरी-चिंचवड विभागाध्यक्षा अंजली घारपुरे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्त केला. अध्यक्षस्थानी प्रशालेचे माजी विद्यार्थी रवींद्र नेर्लीकर यांनी या स्तूत्य उपक्रमाचे कौतुक केले. खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी ओळखून मुलांनी डोंगराएवढे कार्य केले, असे अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले. प्रमुख अतिथी नगरसेवक सद्गुरू कदम यांनी मनोगत व्यक्त केले. आदिवासी कलाकारांचे योगदान या विषयाचे प्रदर्शन लावले होते. शालाप्रमुख एकनाथ बुरसे यांनी प्रास्ताविक केले. वनवासी कल्याणाश्रमाने पुस्तके व भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपप्रमुख सुनंदा कांबळे यांनीआभार मानले. विजया तरटे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांकडून अडीच लाखांचा निधी
By admin | Published: February 10, 2015 1:28 AM