पुणे : स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन'ला पाच कोटींचे बीज भांडवल (सीड फंड) प्राप्त झाला आहे. यांतर्गत अर्ज केलेल्या निवडक स्टार्टअप उद्याेगांना हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
'एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन' ही स्टार्टअप विषयात काम करणारी सेक्शन ८ कंपनी आहे. या माध्यमातून स्टार्टअपना मार्गदर्शन करणे, नवउद्योजक घडविण्यासाठी मार्गदर्शन करणे, स्टार्टअप ना निधी उपलब्ध करून देणे आदी विषयात काम करते. केंद्र सरकारच्या 'स्टार्टअप इंडिया' कार्यक्रमांतर्गत 'सीड फंड स्कीम'च्या माध्यमातून फाउंडेशनला हा निधी प्राप्त झाला आहे. चांगल्या स्टार्टअप ना बळ मिळावे यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
काेण करू शकते अर्ज?
- या सीड फंडसाठी कोणतीही नोंदणीकृत कंपनी, गट किंवा स्वतंत्र व्यक्ती अर्ज करू शकते.
- पात्रतेच्या अटी https://seedfund.startupindia.gov.in/ या लिंकवर उपलब्ध आहेत.
- जे स्टार्टअप डीआयपीपी अंतर्गत नोंदणीकृत असतील त्यांनाच या फंडसाठी अर्ज करता येईल.
- दोन वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या कंपन्यांना यासाठी अर्ज करता येणार नाही
- संकल्पना, उत्पादन विकास, उत्पादन चाचण्या, बाजार प्रवेश आणि व्यापारीकरण या टप्प्यातील स्टार्टअप ना यासाठी अर्ज करण्याची संधी
अशी हाेणार निवड
- आलेल्या अर्जांची छाननी तज्ज्ञांच्या समितीमार्फत केली जाईल.
- अर्जदारांना ४५ दिवसांच्या आत निकाल कळविला जाईल.
- निधीच्या २० टक्के रक्कम ही सुरुवातीच्या टप्प्यावर असणाऱ्या स्टार्टअपसाठी दिली जाईल तर उर्वरित स्टार्टअपना डिबेंचरमध्ये रूपांतरित निधी दिला जाईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र व रिसर्च पार्क फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना स्टार्टअपविषयक मार्गदर्शन केले जाते. या सीड फंडच्या निमित्ताने अनेक स्टार्टअपना नवकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यास मदत होईल. त्यासाठी पात्र स्टार्टअपनी अर्ज करावेत.
- डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका, नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभाग केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ