पुणे : अग्निशमन दलावर सातत्याने होणाऱ्या टीकेची दखल घेऊन आयुक्त कुणाल कुमार यांनी या विभागाच्या आधुनिकीकरणासाठी पाच वर्षांचा विकास आराखडाच तयार केला आहे. ५२ कोटी रुपयांच्या या आराखड्यात २६ अग्निशमन केंदे्र, ५० वाहने, सुमारे २ हजार ५०० कर्मचारी व आगीशिवायच्या आपत्तीत उपयोगी पडणारी अत्याधुनिक रेस्क्यू वाहने यांचा समावेश आहे. त्यातील काही तरतुदी अमलात आणण्याची सुरुवातही करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी व मेट्रोसारख्या आधुनिक सुविधा असलेल्या शहरासाठी अत्यावश्यक असलेल्या आपत्तीनिवारक तरतुदींनुसार हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या शहराची वाढ वेगाने होत आहे. ९० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतीवर असलेले निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे आता १०० मीटरपेक्षाही जास्त उंच इमारती शहरात उभ्या राहू शकतील. नव्या नियमावलीत बांधकाम क्षेत्रासाठी अशा अनेक तरतुदी केलेल्या असून, त्यामुळे शहराच्या विकासात वेगाने वाढ होणार आहे. या तुलनेत पालिकेच्या अग्निशमन दलाची अवस्था मात्र अत्यंत बिकट आहे. त्यामुळेच आयुक्त कुणाल कुमार यांनी अग्निशमन दल प्रमुख प्रशांत रणपिसे यांना सांगून हा आराखडा तयार केला आहे. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनीही यात मार्गदर्शन केले आहे. ऐन वेळी सर्व तरतुदी करण्याऐवजी ५ वर्षांचा आराखडा असेल तर हळूहळू हा विभाग भविष्यातील पुण्यासाठी आदर्श असा तयार करता येईल, असा विचार त्यामागे आहे. त्यातील काही तरतुदींच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्याचे आदेशही आयुक्तांनी अग्निशमन दलाला दिले आहेत. त्यानुसार नव्या केंद्रांसाठी जागांचा शोध घेण्यात येत असून, ५ केंद्रांचा प्रस्तावही अग्निशमन विभागाने प्रशासनाला दिला आहे. अग्निशमन दलाच्या वाहनावरील शिडी साधारण ९० मीटरपर्यंत जाऊ शकते. त्यापेक्षा उंच इमारतींसाठी या आराखड्यात संबंधित इमारतीतच प्रशिक्षित मनुष्यबळ ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. निवासी सोसायट्या तसेच व्यावसायिक इमारतींमध्ये अत्याधुनिक आग प्रतिबंधक साधने तर असतीलच, शिवाय त्यासाठीचे प्रशिक्षण घेतलेले काही कर्मचारीही कायमस्वरूपी नियुक्त असतील. त्यांना अग्निशमन विभागाच्या वतीने प्रशिक्षित करण्यात येईल. उंच इमारतींना असे असे कर्मचारी ठेवणे बंधनकारक करावे, आग लागलीच तर केंद्रामधून मदत येण्यापूर्वीच हे कर्मचारी काम सुरू करतील, असे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. या आराखड्यात केलेल्या एका तरतुदीचा वापर तर त्वरित करण्याची सूचना आयुक्तांनी अग्निशमन विभागाला केली आहे. पोलीस मित्रप्रमाणे अग्निशमन दल स्वयंसेवक या विभागाच्या वतीने तयार करण्यात येणार आहेत. शहराच्या विविध भागांमधील युवकांना विभागाच्या वतीने खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना ओळखपत्र देण्यात येईल. एखाद्या विभागात आग लागली तर अग्निशमन दलाची मदत पोहोचेपर्यंत हे स्वयंसेवक तिथे मदतीचे काम सुरू करतील. जवान आल्यानंतर त्यांनाही ते साह्य करतील. हा उपक्रम लगेचच सुरू करण्याबाबत आयुक्त कुणाल कुमार व अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी प्रशांत रणपिसे यांना सांगितले आहे. (प्रतिनिधी)
‘अग्निशमन’ला निधीचे कवच
By admin | Published: January 25, 2017 2:34 AM