'उपमुख्यमंत्र्यांचा शब्द'; कोरोना प्रतिबंधासाठी निधी कमी पडू देणार नाही..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 06:28 PM2020-05-22T18:28:00+5:302020-05-22T18:46:40+5:30
एखाद्या कोरोनाबाधित नागरिकांचा फोन आला तर तात्काळ रुग्णवाहिका पोहचली पाहिजे.
पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे स्मार्ट सिटीने महापालिकेच्या सहकार्याने सुरू केलेल्या वॉर रूम (डॅश बोर्ड) प्रणालीची कार्यपद्धती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणून घेऊन पुढील नियोजनाबाबत सूचना केल्या. यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या कामांना निधी कमी पडू देणार नसल्याचेही सांगितले.
वॉर रूममधील संगणकीय प्रणालीव्दारे, कोरोनाबाधित रुग्ण, शहरातील बाधित क्षेत्र, वाढत असलेला परिसर याबाबतची अद्ययावत माहिती संकलन व विश्लेषण मांडले गेले आहे. त्यामुळे पुढील उपाययोजना करणे सोपे असून, अगदी सुरुवातीपासूनची माहिती या ठिकाणी मिळू शकते, अशी माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड तसेच अतिरिक्त मनपा आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल यांनी यावेळी दिली. महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त मनपा आयुक्त शंतनू गोयल, आरोग्यप्रमुख डॉ़ रामचंद्र हंकारे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर, रुग्ण वाहिकांची उपलब्धता याबाबतची माहिती घेताना निधी लागत असेल तर मागणी करावा तो लगेच उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. पुणे स्मार्ट सिटीने विकसित केलेली ही संगणकीय प्रणाली उत्तम असल्याचे सांगून त्यांनी, एखाद्या कोरोनाबाधित नागरिकांचा फोन आला तर तात्काळ रुग्णवाहिका पोहचली पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली. तर भविष्याच्या दृष्टिकोनातून बालेवाडीप्रमाणे अन्य ठिकाणीही कोविड सेंटर कार्यान्वित करावेत अशी सूचना केली.
यावेळी पवार यांनी, पहिला रुग्ण बरा झाल्यानंतर पुन्हा त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना लागण झाली काय याची विचारणा केली असता, मनपा आयुक्त गायकवाड यांनी, पुन्हा संबंधित रूग्णाला कोरोनाची लागण झाली नसल्याचे सांगून, महापालिकेची आरोग्य यंत्रणा त्यांच्या सतत संपर्कात असल्याचे सांगून रोज अन्य चार ते साडेचार हजार लोकांना फोन करून माहिती घेतली जात असल्याचेही सांगितले.