पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 08:05 PM2020-03-10T20:05:56+5:302020-03-10T20:06:16+5:30
पुण्यातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा, अखंडित वीज, रिंगरोड, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आदींसाठी निधी
पुणे : पुणे शहराचा झपाट्याने विकास होत असून, शहराच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी येथे दिले.
कोंढवा खुर्द येथील प्रभाग क्र. २६ येथील ४.५ किलोमीटर ५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी व श्री गुरू नानकदेवजी उद्यानाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, नगरसेविका नंदा लोणकर तसेच लोकप्रतिनिधी व महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘उद्याने ही शहरांची फुफ्फुसे आहेत. प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनावर भर द्यायला हवा. त्याचबरोबर घनकचरा वर्गीकरण व विघटन करणे आवश्यक आहे. पुण्यातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा, अखंडित वीज, रिंगरोड, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आदींसाठी निधी देण्यात येत असून जागतिक दर्जाचा चित्रपट महोत्सव होण्यासाठीही सहकार्य करण्यात येत आहे.’’
०००
नागरिकांनी खबरदारी घ्यावी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सूचना देत, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी सर्वांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले. यामुळे नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, हस्तांदोलन करू नये, खोकताना व शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा अशा सूचना देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन पवार यांनी केले.