पुणे : भाजपचे नगरसेवक व जेष्ठ कार्यकर्ते महेश लडकत यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. २९) दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
लडकत यांचे सोमवारी (दि. २८) रात्री दहाच्या सुमारास निधन झाले होते. आज सकाळी त्यांचे पार्थिव प्रथम घरी व त्यानंतर अंत्यदर्शनासाठी नवी पेठ येथील संपर्क कार्यालयात नेण्यात आले.
दुपारी १ च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे, भीमराव तापकीर, शिवसेना शहराध्यक्ष अजय मोरे, मनसे अध्यक्ष अजय शिंदे, बाळासाहेब अनास्कर, पालिकेचे गटनेते गणेश बिडकर, नगरसेवक धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, दीपक पोटे तसेच पालिकेतील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली काही आठ महिने ते आजराशी झुंजत होते. त्यातच त्यांचे आजराने निधन झाले. मनमिळाऊ स्वभावाच्या लडकत यांचे ५३ व्या वर्षी निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्यमान नगरसेवक लडकत यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून महापालिकेस मंगळवारी अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात आली.
चौकट
लडकत यांच्या स्मृती जतन करणार : महापौर
“गेली ३५ वर्षे पतित पावन संघटना, भाजपमध्ये कार्यरत असलेले लडकत हे मुळातच कार्यकर्त्याचा पिंड असलेले होते. त्यांच्या जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. सामान्यांसाठी नेहमी धडपडणारे महेशदादा आपल्याला सोडून गेले. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी त्यांची मैत्री होती. त्यांच्या स्मृतींचे महापालिकेकडून जतन करण्यात येईल,” असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.