लोकमत न्यूज नेटवर्क
पाईट : कुरकुंडी येथील वीर जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे (वय ३०) यांचे आसाम येथे कार्यरत असताना अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.
कुरकुंडी येथील मूळ असलेले संभाजी ज्ञानेश्वर राळे हे लष्करात कार्यरत होते. आसाम येथे लष्करी सेवा बजावत असताना आजारी असल्याने त्यांचा बुधवारी मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव लष्कराच्या विशेष विमानाने शुक्रवारी सकाळी लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. विमानतळावरून लष्कराच्या विशेष वाहनाने त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी कुरकुंडी येथे नेण्यात आले. अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले. यानंतर फुलांनी सजवलेल्या लष्करी वाहनात त्यांची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्याची सांगता राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात झाली.
लष्करातर्फे त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. सकाळी १० वाजता त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमले होते. बुंदुकीच्या २१ फैरी झाडत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. साश्रू नयनांनी ‘शहीद संभाजी ज्ञानेश्वर राळे अमर रहे’ अशा घाेषणा देत त्यांना ग्रामस्थांनी अखेरचा निरोप दिला.
फोटो: जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.