बारामती (सांगवी) : विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या गीतांजली अभिषेक तावरे या विवाहित महिलेच्या संतप्त नातेवाईकांकडून टाहो फोडत सासरच्या दारासमोरच पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी विवाहितेने विष प्राशन केल्यानंतर पुण्यात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी (२७ रोजी ) मृत्यू झाल्या नंतर सांगवी येथे सासरच्या दारात आणल्यानंतर माहेरकडील नातेवाईकांनी अंत्यसंस्कार प्रसंगी गोंधळ घातल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. पुढे गावातील काही अनर्थ घडून येऊ न देण्यासाठी गावातील व सासरकडील लोकांनी दारात अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.
सांगवी (ता. बारामती ) येथील गितांजली अभिषेक तावरे या विवाहित महिलेने विष प्राशन करून जीवन संपविले. वारंवार पैसा व सोन्याची मागणी केल्यावर वर्षभरात १५ लाख रूपये व २५ तोळे सोने व इतर सर्व गोष्टीची पूर्तता करून देखील पुन्हा मृत गीतांजलीकडे तगादा लावला होता. मात्र, यावेळी ५० तोळे सोन्याची मागणी पूर्ण न झाल्याने आमच्या मुलीला सासरच्या लोकांनीच विष पाजून, इंजेक्शन देऊन मारल्याचा खळबळजनक आरोप मृत महिलेची चुलती नमिता अरुण यादव (रा.गूरसाळे ता.माळशिरस ) व नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. मृत गीतांजलीचे नातेवाईक सासरच्या लोकांवर पोलिसांत गुन्हा दाखल करणार आहे.