पुणे: स्वारगेटजवळील कॅनॉलमध्ये पाेहायला गेला असताना मुलाचा बुडून मृत्यू झाला. त्याच जागी एका मुलाचा मृतदेह पाण्यात फुगून वर आला. या मुलाचा चेहरा माशांनी विद्रुप केला होता. सापडलेला मृतदेहही तेथे बुडालेल्या मुलाशी मिळताजुळता असल्याने त्याच्या नातेवाईकांनी तो मुलगा आपलाच असल्याचे सांगितले. त्यानुसार नातेवाईकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर हडपसर येथे आणखी एका मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या हातातील रबर बँड पाहून मुलाचे अंत्यसंस्कार केलेल्या कुटुंबीयांनी हा आपल्या मुलाचा मृतदेह असल्याचे ओळखून पुन्हा त्यावर अंत्यसंस्कार केले. भूषण लक्ष्मण धोत्रे (वय १८, रा. पिंपरी-चिंचवड) आणि वेदांत संजय कदम (वय १७, रा. सिंहगड रोड) या दोन मुलांबाबत ही घटना घडली.
भूषण लक्ष्मण धोत्रे हा त्याच्या मामाकडे स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यासाठी आला होता. उकाडा जास्त असल्याने तो २४ मे रोजी मित्रांबरोबर कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेला. पोहत असताना तो अचानक बुडाला. सर्वांनी शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्याच ठिकाणी यापूर्वी मृतदेह बुडून वर आल्याचा नागरिकांचा अनुभव होता. त्यामुळे नागरिक रात्री त्याच ठिकाणी लाईट, टॉर्च लावून मृतदेह वर येण्याची वाट पाहत होते. त्यांना एका मुलाचा मृतदेह तेथेच आढळला. या मुलाचा चेहरा माशांनी खाल्याने विद्रुप झाला होता. मुलाच्या नातेवाईकांनीही हा भूषणचाच मृतदेह असल्याचे सांगितले. त्या वेळी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तो मृतदेह त्यांच्या हवाली करण्यात आला. त्यांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
त्यानंतर या घटनेत दुसरे वळण आले. सिंहगड रोड परिसरात २४ मे रोजी वेदांत कदम हा कॅनॉलवर पोहायला गेला असताना तो बुडाला होता. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तशी नोंद करण्यात आली होती. पण त्याचा मृतदेह आढळून आला नव्हता. दरम्यान, हडपसर पोलिसांना पाण्यात वाहत आलेला एक मृतदेह मिळाला. त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी धोत्रे व कदम यांच्या कुटुंबीयांना बोलाविले. या मृतदेहाचा चेहराही विद्रुप झाला होता. त्याच्या हातातील रॉयल एन्फिल्ड नावाच्या रबर बँडवरून तो भूषणच असल्याचे धोत्रे कुटुंबीयांनी ओळखले. त्यामुळे अगोदर अंत्यसंस्कार केलेला मुलगा आपला नसल्याचे धोत्रे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी हडपसर येथे आपल्या मुलावर अंत्यसंस्कार केले. एका कुटुंबाला आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करता आले नाही.