पुणे : रेकॉर्डवरील गुन्हेगार माधव वाघाटे याच्या खुनानंतर त्याच्या साथीदारांनी काढलेल्या अंत्ययात्रेकडे दुर्लक्ष केल्याकडे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गांभीर्याने दखल घेतली. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ आणि गुन्हे अशा दोन्ही पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे यांची आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत तर, गुन्हे निरीक्षक राजेंद्रकुमार कदम यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर सायबर व आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांची सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी काढले आहेत.
माधव वाघाटे याचा बिबवेवाडी पोलीस चौकीसमोर खुन झाला होता. त्यानंतर त्याची अंत्ययात्रा सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी येथून कात्रज स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली होती. याबाबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस उपायुक्तांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत पोलीस आयुक्तांनी सर्वांना चांगलेच फैलावर घेतले होते. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त, परिमंडळ २ चे उपायुक्त यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात दिवसभर तळ ठोकून या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांना पकडण्यासाठी विशेष मोहिम राबविली. दिवसभरात १०० हून अधिक जणांना पकडण्यात आले. सध्या त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. अजूनही त्यातील सहभागी असलेल्यांची शोध मोहिम सुरु आहे. ही कारवाई झाल्यानंतर आता पोलीस ठाणे पातळीवर आयुक्तांनी कारवाई करुन एकाचवेळी सहकारनगर पोलीस ठाण्यातील दोन्ही पोलीस निरीक्षकांची बदली केली आहे.
गेल्या वर्षीच्या सुरुवातीला सामाजिक सुरक्षा विभागाबाबत तक्रारी असल्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी एकाचवेळी सामाजिक सुरक्षा विभागातील सर्व कर्मचार्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर प्रथमच एखाद्या पोलीस ठाण्यातील दोन्ही पोलीस निरीक्षकांचा एकाचवेळी बदल्या झाल्या आहेत.