पुणे : भारतीय जनता पक्षाला पुणे महापालिकेत सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाल्यावर महापौर बदल होणार अशी चर्चा शहरात सुरु आहे. अशा स्थितीत महापौर मुक्ता टिळक देऊ करत असलेले पाकीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न स्वीकारल्याने त्या पाकिटात नेमके काय होते या चर्चेला ऊत आला होता. फेब्रुवारी २०१७ साली भारतीय जनता पार्टीने पुणे महापालिकेवर बहुमताचा झेंडा फडकवला. महापौर आरक्षणातून खुल्या महिला गटाद्वारे मुक्ता टिळक महापौरपदी विराजमान झाल्या. मात्र यापूर्वी सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने सव्वा वर्ष महापौरपदाचा फॉर्म्युला वापरला होता. त्याच धर्तीवर भाजपमध्येही महापौर बदल व्हावा अशी काहींची इच्छा आहे.
मंगळवारी पुण्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि महपौर एकाच व्यासपीठावर होते. या कार्यक्रमात महापौर टिळक यांनी एक पाकीट मुख्यमंत्र्यांना देण्याचा प्रयत्न केला आणि मात्र मुख्यमंत्र्यांनी ते पाकीट स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे टिळक यांचा राजीनामा मुख्यमंत्री स्वीकारत नसल्याची चर्चा सभागृहात रंगली. भरीस भर म्हणजे कार्यक्रम संपल्यावर टिळक यांच्या विरोधात स्पर्धेत असणाऱ्या वर्षा तापकीर, ज्योत्स्ना एकबोटे, माधुरी सहस्रबुद्धे,नीलिमा खाडे यांनी मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यामुळे महापौरपदी कोण अशीही चर्चाही सुरु झाली.
प्रत्यक्षात महापौर टिळक यांनी एका कार्यक्रमाच्या आमंत्रणाचे पाकीट व पत्र मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यामुळे त्यात राजीनामा काहीही वगैरे नव्हता असेही त्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. माझ्याकडे आत्ता नोंदवही नसल्यामुळे आमंत्रण सहाय्यकाकडे द्या असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पाकीट घेतले नाही असेही त्या म्हणाल्या. महापौरपदात सध्या तरी बदल होणार नाही असा दावाही त्यांनी केला.