पुणे : फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांसाठी लोकसंख्येनुसार ‘ब’ वर्ग नगरपालिका करता येऊ शकते, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. त्यामुळे या अहवालावर अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे २०१७ मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. महापालिकेने आकारलेला मिळकत कर जास्त असल्याने आणि कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा दावा करत या गावांनी महापालिकेतून वगळण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ६ डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या बैठकीत केली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे महापालिका हद्दीत वगळण्याचे आणि या दोन गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांनी हरकती-सूचना नोंदविण्याचे आवाहन केले होते.
साडेचार हजारहून अधिक हरकती-सूचना
महिनाभराच्या मुदतीत जिल्हा प्रशासनाकडे साडेचार हजारांहून अधिक हरकती-सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यावर सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी अभिप्रायसह अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. ‘ब’ वर्ग नगरपालिकेसाठी लोकसंख्येसाठीची अट ७५ हजार आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन्ही गावांची मिळून एकूण लोकसंख्या ७५ हजार ४०५ आहे. त्यात फुरसुंगी गावची लोकसंख्या ६६ हजार २ तर उरुळी देवाची गावची लोकसंख्या ९ हजार ४०३ आहे.