पुणे - महापालिकेच्या हद्दीत मध्ये समाविष्ट झालेल्या फुरसुंगी गावाची ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्यात आली आहे. तशी माहिती निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहाराद्वारे कळविली आहे.
निवडणूक आयोगाने ऑक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपत असलेल्या ८ हजार ५०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मुदत संपत असलेल्या ७ हजार ५७६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पुण्यातील १२ तालुक्यांमधील २२३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका होणार आहेत. जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरमध्ये मुदत संपणा-या ११ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार असून दुस-या टप्प्यात २११ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये फुरसुंगी गावाचाही समावेश होता. या ग्रामपंचायतीची मुदत २७ डिसेंबरला संपत असल्याने दुस-या टप्प्यात मतदान अपेक्षित होते.
नुकतीच जिल्ह्यातील प्रस्तावित ३४ गावांपैकी ११ गावे महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याची अधीसूचना राज्य शासनाने काढली आहे. त्यामुळे फुरसुंगीची निवडणूक स्थगित करावी अशा सुचना निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. उर्वरीत ग्रामपंचायतींची निवडणूक मात्र ठरल्याप्रमाणे पार पडणार आहे.