फिुरसुंगी : फुरसुंगी उरूळीदेवाची येतील कचरा डेपोवरील हंजर प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्याला रविवारी सकाळी मोठी आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठया प्रयासाने आग आटोक्यात आणली. मात्र हा कचरा प्रकल्पात कचरा टाकणे अनेक दिवसांपासून बंद असताना आग लागली कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. कचराप्रकल्पामध्ये हेतूपरस्पर आग लावण्यात आल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे.फुरसुंगी येथील डेपोवर शहरातील कचरा टाकण्यात १ जानेवारी २०१५ पासून मज्जाव करण्यात आला आहे. काही अटींची पूर्तता केल्यानंतर कचरा टाकू देऊ अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. अशातच रविवारी सकाळी कचरा डेपोला आग लागली. हडपसर, कात्रज येथील अग्निशामक दलाच्या गाडया तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आल्या. दोन तासाच्या प्रयत्नानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. तसेच पुन्हा अचानक आगीने पेट घेतल्यास खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या दोन गाडया रात्रभर डेपोवर ठेवण्यात आल्या. (प्रतिनिधी)
फुरसुंगी डेपोला हेतूपुरस्सर आग
By admin | Published: February 08, 2015 11:14 PM