लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. लस घेण्यासाठी अनेकांनी कोविन पोर्टलवर नोंदणी केली. मात्र, हे पोर्टल निट काम करत असल्याने जिल्ह्यात नोंदणीकृत केंद्रांवर मोठी गर्दी झाली. यामुळे या केंद्रावरच कोरोना नियमावलीचा फज्जा उडाला असल्याचे चित्र होते. या गोंधळात अनेकांना लस न घेताच माघारी फिरावे लागले. केंद्र शासनाने शनिवार (१ मे) पासून १८ वर्षापुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू केले. त्यानुसार पुणे जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी जिल्हा अरोग्य विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील १४ केंद्रावर या वयोगटाचे लसीकरणास सुरूवात झाली आहे. प्रत्येक केंद्रावर या वयोगटातील केवळ १०० जणांनाच लस घेता येणार आहे. मात्र, पोर्टल नीट काम करत नसल्यान या केंद्रावर अनेकांनी नोंदणी करत लस घेण्यासाठी गर्दी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर लसीकरण केंद्रांवर तरूणांसह ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी झाली. हीच परिस्थीती राजगुरूनगर येथील केंद्रावरही होती. त्यामुळे आजारापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती तर निर्माण होणार नाही ना ? याची भीती नागरिकांमध्ये होती.
लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केेंद्रावर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाठी आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव व डॉ. रूपाली बंगाळे यांनी तयारी केली होती. लस घेण्यासाठी या वयोगटातील सुमारे २५० ते ३०० नागरिकांनी सकाळ पासूनच गर्दी केली होती. येथे जागा अपुरी असल्याने शारिरीक अंतर तसेच कोरोना नियमांचे पालन झाले नाही. ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांनाच लस दिली जाणार असे जाहीर करूनही ज्यांना एसमएमस मिळाले नाहीत तसेेेच शनिवार व रविवार लस मिळणार नाही हे जाहिर करूनही जेष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर आले. यामुळे गर्दी वाढली. लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रत्येकजण आपणांस आलेला एसएमएस डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी यांना दाखवत होता. परंतू प्राथमिक आरोग्य केेंद्राचे संगणकावर दुपारी २ वाजले नंतर लस देण्यासाठी फक्त १०० जणांच्या नांवाची यादी आली असल्याने इतर नाराज होवून घरी परतले. परंतू काही महाभागांनी आम्हाला एसएमएस आला आहे. लस मिळालीच पाहिजे अशी भुमिका घेतली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते
चौकट
पोर्टलला समस्या येत असल्यानं ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जावून तेथे नोंद करून लस घेणे हा पर्याय सोपा वाटत आहे. परंतू त्यामुळे वाढत्या उन्हात तासनतास रांगेत उभं राहण्याची शिक्षा त्यांना भोगावी लागतेय. त्यामुळे अनेकदा सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाल्याचं दिसते आहे. त्यामुळे लस घेऊन कोरोनापासून वाचण्यापेक्षा ही गर्दीच कोरोनाला निमंत्रण देणारी तर ठरणार नाही ना, अशी भीती सर्व स्तरातून व्यक्त होते आहे. यामुळे येथील ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन सदर लसीकरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अथवा हायस्कूल मध्ये करण्याचे नियोजन केले तर सोशल डिसंन्सिंगचे पालन होवून नागरिकांचे उन्हापासून संरक्षण होईल. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना व्यतिरिक्त इतर आजारावर औषधोपचार घेण्यासाठी येतात त्यांनाही दिलासा मिळेल अशी चर्चा येथील नागरिक करत आहेत.
चौकट
१४ ते ४४ वयोगटाचे जिल्ह्यातील लसीकरण
पुणे जिल्हा लसीकरण केंद्र रोजचे लक्ष्य झालेले लसीकरण
ग्रामीण भाग १४ १४०० १३५६
पुणे शहर २ ७०० ३८०
पिंपरी चिंचवड ३ ६०० ५८९
एकुण १९ २७०० २३२५