तरुणांना धार्मिक दहशतवादापासून दूर ठेवण्यासाठी शिक्षण हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये ऊर्जा व इतर क्षेत्रात गुंतवणूक मोठी गुंतवणूक केली. भारत अफगाणिस्तानातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्यांना पुरोगामी वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच भारतातून शिक्षण घेऊन गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीचे काम केले आहे. मात्र, या पुढील काळात या विद्यार्थ्यांना भारतात येऊन शिक्षण घेणे शक्य झाले नाही, तर अफगाणिस्तान आणखी काही वर्षे मागे जाईल.
तालिबानने १९९६ मध्ये अफगाणिस्तानचा घेतलेला ताबा आणि सध्या २०२१ मध्ये घेतलेला ताबा यात बराच फरक आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी १९९६ मध्ये तालिबानने मानवी हक्कांची पायमल्ली केली होती. महिलांचे स्वातंत्र, हक्क नाकारले होते. महिलांवर अत्याचार केले होते. सध्या तूर्त तरी असे काही घडताना दिसत नाही. कारण, तालिबानच्या सत्तासंघर्षाला चीन, पाकिस्तान, रशियाने पाठिंबा दिला आहे. अमेरिकेला शह देण्यासाठी या तीनही राष्ट्रांनी हे घडवून आणले आहे.
केवळ साठ हजार तालिबान्यांसमोर दोन ते अडीच लाख अफगाण सैनिक नतमस्तक झाले. त्यामागे एक ‘ग्रेट गेम’ आहे. ज्या पध्दतीने सध्या सर्व काही घडत आहे, तसेच या पुढेही घडत राहिले तर तालिबानच्या नावाने चीन, पाकिस्तान रशियाचे ‘पपेट’ सरकार येथे चालेल. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना व इतर देशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शिक्षण घेऊन अफगाणिस्तानमध्ये गेलेले विद्यार्थी त्या देशाची एक मोठी संपत्ती आहेत. त्यांनी तेथील मंत्रालयात, उद्योग आणि खासगी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका तेथील विद्यार्थ्यांना निश्चितच बसणार आहे. मोबाईल नेटवर्क, इंटरनेट कनेक्टिव्हिटी या समस्या सुरू झाल्या आहेत. मुलींवरचे निर्बंध केवळ बुरखा घालण्यापुरते नाहीत. त्यांनी काय शिकावे, सार्वजनिक ठिकाणी कसे वावरावे? आदीबाबत कोणते धोरण स्वीकारले जाते, या संदर्भात अद्याप स्पष्टता नाही. तालिबानने अफगाणिस्तानात १९९६ सारखेच धोरण राबवले, तर येथील नवीन पिढीचे भवितव्य अंधकारमय होईल. अमेरिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले तरीही अफगाणिस्तानचा फारसा विकास झाला नाही. कारण, तेथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर आहे. अफगाणिस्तानात विविध वंशाचे लोक राहतात. त्यांच्यात सांघिक भावना किंवा राष्ट्रीयत्वाची भावना फारशी दिसत नाही. अफगाणिस्तान महाराष्ट्राच्या केवळ दीडपट मोठा असून त्याची भौगोलिकस्थिती डोंगराळ व टेकड्यांची आहे. या भौगोलिक स्थितीचा अफगाणी नागरिकांनी नेहमीच फायदा करून घेतला. त्यामुळेच अमेरिका आणि सोव्हियत युनियनसारख्या बलाढ्य राष्ट्रांना अफगाणिस्तानने रोखले होते. मात्र, तालिबान्यांनी दुसऱ्यांदा अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता तालिबानी सहजासहजी ताबा सोडणार नाहीत.