हिंजवडी : शालेय जीवनात मुले मैदानी खेळ, स्पर्धा विसरले असून, जास्तीत जास्त वेळ मोबाइल वापरण्यात व्यस्त दिसत आहेत. यामुळे भावी पिढी बरबाद होत असून, किमान शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनामोबाइल बंदी करा, असे आवाहन हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी केले. थेरगाव येथे दत्तमूर्ती स्थापनेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कीर्तन कार्यकमात ते बोलत होते.
इंदुरीकर महाराज म्हणाले, शालेय जीवनात मुलांना महागड्या मोबाइलची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करून, मुले शाळेच्या आवारात, वर्गात मोबाइलवर वेळ घालवतात. तसेच, शिक्षकसुद्धा शिकवताना फोन आल्यावर बाहेर जाऊन मोबाइलवर बोलत बसतात. हे सर्व चिंताजनक असून, किमान शाळेच्या आवारात मोबाइल वापरावर बंदी असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी शासन दरबारी काही नियमावली करता येते का त्यासाठी संसदेत प्रयत्न करण्याचं आवाहन इंदुरीकर महाराजांनी खासदार श्रीरंग बारणे यांना केले.
आपापसात भांडणे करून उपयोग नाही, संयम बाळगा, मुलांना थोडं तरी सांप्रदायाचे शिक्षण द्या, किमान धर्म वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. माणसाला जिवंत राहण्यासाठी शुद्ध ऑक्सिजनची गरज असून, कोरोना महामारीत सर्वांनी याचा कटू अनुभव घेतला आहे. त्यामुळे शक्य असेल तिथे घराभोवती तुळशी लावणे गरजेचे आहे. असे आवाहन इंदुरीकरांनी उपस्थितांना केले. दरम्यान, थेरगावातील हिरामण बारणे चाळ येथील दत्तमंदिराचा विसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.