पुणे : महापालिकेचे नगरसेवक माजी झाले त्याला वर्ष होऊन गेले, तरीही महापालिकेची निवडणूक जाहीर व्हायला तयार नाही. दरम्यानच्या काळात कसबा विधानसभेची पोटनिवडणूक झाली अन राजकीय वातावरण तजेलदार झाले. आता ते कायम ठेवायचे म्हणून रिकाम्या राजकीय चर्चांना शहरात उत आला आहे. त्यातूनच भावी खासदार व भावी आमदार याबरोबरच आता भावी मुख्यमंत्री असेही फ्लेक्स सगळीकडे लागत आहेत. अजित पवार यांच्या हालचालींनी यातील गूढ वाढतच चालले आहे.
खुद्द अजित पवार यांनी स्वत:च ‘मी जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार’ असा खुलासा केला, त्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या विषयावरील धुरळा खाली बसला, मात्र त्यांचे कार्यकर्ते शांत बसायला तयार नाहीत. पवार यांचे भले मोठे छायाचित्र व त्यावर भावी मुख्यमंत्री असे लिहिलेले मोठेमोठे फलक त्यांचे समर्थक शहरात लावत आहेत. त्यावरून पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची चर्चा जोर धरत आहे. अपात्रतेच्या याचिकेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरून शिंदे-फडणवीस यांच्या सत्तेचा डोलारा ढासळू शकतो, त्यामुळेच भाजपाने पवार यांच्यावर लक्ष केंद्रीत केले असल्याचे बहुसंख्य कार्यकर्त्यांचे खात्रीशीर मत आहे. पवार तिकडे जातील ते मुख्यमंत्री होण्यासाठीच असे त्यांना वाटते, त्यामुळे आतापसूनच त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना प्रोजेक्ट करण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे शहर लोकसभेची जागा रिकामी झाली आहे. निवडणूक आयोगाने या जागेवर अजून पोटनिवडणूक जाहीरही केलेली नाही. तरीही याजागेची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजप बापट यांच्या कुटुंबात म्हणजे त्यांची पत्नी किंवा मग स्नुषा स्वरदा यांना उमेदवारी देऊन ही पोटनिवडणूक बिनविरोध कऱ्ण्याचा प्रयत्न करेल असे बोलले जाते. बापट यांचे चिरंजीव गौरव व स्वरदा बापट यांच्या एकत्रित हालचाली लक्षात घेतल्या तर या समजाला पुष्टीही मिळते. मात्र तरीही भाजपमधून भावी खासदार म्हणून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नाव या जागेसाठी घेतले जात आहे. त्यांनीही अचानक मोठेमोठे जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यास सुरूवात केली आहे. प्रा. कुलकर्णी यांच्याबरोबरच माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचेही नाव भावी उमेदवार म्हणून घेतले जात आहे.
या जागेसाठी भाजपतच अशी रस्सीखेच सुरू असताना अचानकच राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर दावा सांगायला सुरूवात केली. फक्त दावाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, माजी महापौर प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून फलकही शहरात लागले आहेत.अजित पवार यांनीच प्रशांत जगताप यांना माझ्या शुभेच्छा असे जाहीरपणे सांगितल्याने ही चर्चा आता वाढली आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी या जागेवर कसा दावा सांगणार या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्याकडे उमेदवार कुठे आहे असा प्रश्न विचारला जातो. काँग्रेसमध्ये मात्र त्यांची जागा असूनही या विषयावर निवांतपणा आहे. अजूनही तरी काँग्रेसमधून या जागेवर जाहीरपणे कोणाचे नाव घेतले गेलेले नाही. बापट यांच्या विरोधात लढलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी मात्र या सर्व हालचालींकडे लक्ष ठेवून असल्याचे दिसते आहे, कारण तेही शहरात अचानक ॲक्टिव्ह झाले आहेत.
हालचालींनी वाढले गूढ
अजित पवार यांच्या हालचालींनीही राजकारणाचे गूढ वाढले आहे. शुक्रवारी सकाळी ते पुण्यात बारामती हॉस्टेलमध्ये होते. काही जाहीर कार्यक्रमही त्यांनी केले. ते कार्यकर्त्यांची बैठक घेणार अशीही चर्चा होती. त्यानंतर अचानक पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून सायंकाळी उशीरा ते मुंबईला गेले. लोकमत च्या एका कार्यक्रमात काही महिन्यांपूर्वी बोलताना त्यांनी सन २००४ मधील मुख्यमंत्रीपदाची संधी राष्ट्रवादीच्या नेतृत्वामुळे गेली अशी खंत व्यक्त केली होती. त्यानंतर शुक्रवारीच पुण्यात बोलताना त्यांनी, ‘नंतर कशाला, मला तर आताही मुख्यमंत्री व्हायला आवडेल’ असे वक्तव्य केले. त्यांच्या या हालचालींनीच राजकीय गूढ वाढले आहे.