पुणे : जगभरातील विविध प्रसिद्ध रेल्वे प्रतिकृतींचे अनोखे संग्रहालय असलेल्या ‘जोशीज मिनिएचर रेल्वे म्युझियम’च्या स्थापनेला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संग्रहालयात लवकरच ‘वंदे भारत’ या देशातील पहिल्या हाय स्पीड रेल्वेच्या प्रतिकृतीचा समावेश केला जाणार आहे. या रेल्वेच्या प्रतिकृतीचे आनावरण नुकतेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, २५ वर्षांपूर्वी साकारलेले हे मिनिएचर रेल्वे म्युझियम मोठे काम असून, हे काम उभारण्यापूर्वी सुमारे २५ वर्षांपासून त्याची तयारी केली गेली असेल. भाऊ जोशी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे याठिकाणी आज वंदे भारत रेल्वेच्या प्रतिकृतीचे अनावरण होत आहे, ही खरोखरच आनंदाची बाब आहे, कारण आगामी काळ हा वंदे भारत रेल्वे चा असणार आहे, असे मत व्यक्त केले. या मॉडेलच्या वैशिष्ट्याबाबत माहिती देताना रवी जोशी यांनी, म्युझियमच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आम्ही वंदे भारत रेल्वेची प्रतिकृती संग्रहालयात समाविष्ट करत आहोत. गेल्या २५ वर्षांत देशभरातील नागरिकांनी या संग्रहालयाला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे, असे सांगितले.
१९९८ साली साकारले जोशीज म्युझियम ऑफ मिनीएचर रेल्वेज..
बालकृष्ण जोशी (भाऊ जोशी) यांनी स्केल मॉडेल्स गोळा करण्याच्या छंदातून तब्बल चाळीस वर्षे देश विदेशातून रेल्वेची स्केल मॉडेल्स संकलित केली होती. परदेशात असलेल्या स्केल मॉडेल या छंदाबाबत भारतीयांना माहिती व्हावी या उद्देशाने त्यांनी १९८२ साली १८’’ व्यासाच्या भागावर १:८७ या प्रमाणाने एक चलत मॉडेल तयार केले. मुंबई, पुणे या ठिकाणी याचे प्रदर्शन केल्यावर त्याला एक स्थायी स्वरूप द्यावे, या उद्देशाने त्यांनी २५ वर्षांपूर्वी म्हणजे १ एप्रिल १९९८ रोजी जोशीज् म्युझियम ऑफ मिनीएचर रेल्वेज साकारले. आज याठिकाणी डीझेल रेल्वे, स्टीम इंजिन (वाफेवरील इंजिन), इलेक्ट्रिक रेल्वे, रेल बस, रोप वे, फिनीक्युलर रेल्वे, टॉय ट्रेन अशा विविध प्रकारच्या सात पेक्षा अधिक रेल्वे प्रतिकृती पाहायला मिळतात.