पुणे जिल्ह्यातील ६४९ ग्रामपंचायतीच्या 'कारभारीं'चे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 12:50 PM2021-01-15T12:50:15+5:302021-01-15T14:06:37+5:30
९५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध..
पुणे : गेल्या एक महिन्यांपासून रणधुमाळी सुरू असलेल्या जिल्ह्यात 649 ग्रामपंचायतीसाठी गुरुवार (दि.15) रोजी मतदान होत आहे. यासाठी तब्बल 11 हजार 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.
कोरोनामुळे रखडलेल्या जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. यात आमदार, स्थानिक नेत्यांच्या पुढाकारामुळे 95 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. आता 649 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सुरक्षित सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझर, मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती आदी गोष्टींची खबरदारी घेण्यात आली आहे. यामुळे गुरुवारी (दि.15) रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर मतमोजणी सोमवार (दि.18) रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.
-----
डाव्या हाताच्या अनामिकेला शाई लागणार
जिल्ह्यात काही दिवसांपुर्वीच पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मतदान झाले असून, अनेक मतदारांच्या बोटाची शाई अद्याप गेलेली नाही. यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत डाव्या हाताच्या तर्जनी व मधल्या बोटा ऐवजी अनामिकेला शाई लावण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
-----
जिल्ह्यातील निवडणुका होणा-या तालुकानिहाय ग्रामपंचायती
खेड -80 भोर-63 शिरूर-62, जुन्नर-59, पुरंदर-55 इंदापूर-57, मावळ - 49, हवेली- 45 बारामती- 49, दौंड - 49, मुळशी - 36, वेल्हा - 20, आंबेगाव- 25 , एकूण : 649
--------
- जिल्ह्यातील निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायती : 748
- बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती : 95
- मतदान होत असलेल्या ग्रामपंचायती : 649
- एकूण प्रभाग संख्या : 5033
- एकूण उमेदवार : 11007
- महिला उमेदवार : 5004
- एकूण मतदान केंद्र : 2439
- अधिकारी-कर्मचारी : 13417
------
निवडणुकीसाठी 5 हजार पेक्षा अधिक बंदोबस्त
ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गावकी-भावकीचे राजकारण तापलेले असते. अशा परिस्थितीत मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यात 5 हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
-------
प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथक नियुक्त
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने जिल्हा प्रशासनाने अधिक खबरदारी घेतली आहे. सुरक्षित सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझर, मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मतदानासाठी शेवटचा अर्धा तास राखीव ठेवला आहे.