तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, सणसवाडी, कोरेगाव भीमा, धानोरे, दरेकरवाडी, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, कोंढापुरी, कासारी, बुरुंजवाडी, डिंग्रजवाडी, वाडा पुनर्वसन गावठाण आदी १६ गावांचा समावेश होतो. या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून, दररोज नव्याने ५० ते १५० कोरोनाबाधित आढळून येत असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात कोविड अँटिजेन टेस्ट करण्यात येतात.
आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढलेला असतानाच तालुक्यातील केंदूर व अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावातील नागरिकांनीही तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणीसाठी गर्दी केली होती. वास्तविक तालुक्यात ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर शिक्रापूर, न्हावरे व शिरूर आदी ३ ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात कोविड टेस्ट होत असल्याने नागरिकांनी त्यांच्या क्षेत्रातील निकटच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणी करावी, असे आवाहन तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी केले आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांची नियुक्तीसंदर्भात ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याइतपत सक्षम नसल्याने ते शक्य झाले नाही.
--
चौकट
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चार डॉक्टर्स व आवश्यकतेनुसार इतर आरोग्य कर्मचारी नेमावेत व त्यांचा मानधनाचा खर्च ग्रामनिधी अथवा इतर निधीतून करावा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र ग्रामपंचायतीने अशा नेमणुका केल्या नाहीत. त्यामुळे मनुष्यबळाअभावी अडचणी निर्माण होत आहेत.
- डॉ.प्रज्ञा घोरपडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव ढमढेरे.
--