पुणे : पुण्यामध्ये जी-20 अंतर्गत दोन बैठका होत आहेत, त्यानिमित्त पुणे महापालिका सायकल क्लबच्या वतीने भव्य सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 2 हजार 200 सायकल प्रेमी या उपक्रमात सहभागी झाले. भारताकडे G20 परिषदेचे यंदा असलेले अध्यक्षपद, याबद्दलची जनजागृती व "सायकल चालवा पर्यावरण वाचवा" हा संदेश घेऊन सायकल फेरी काढण्यात आली.
पुणे महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी सायकल फेरीला झेंडा दाखवून सुरुवात करून दिली. पुणे मनपा भवन, मॉडर्न कॅफे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिवार वाडा मार्गे पुन्हा मनपा भवन या मार्गाने सर्व सायकलवीरांनी शहरात चक्कर मारली. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात विविध वयोगटातील स्त्री पुरुष या फेरीमध्ये सहभागी झाले होते. लहान मुलांचा सहभाग देखील लक्षणीय होता. सर्व सहभागी सायकल स्वारांना G-20 स्मृतीपदके देण्यात आली.फेरीचे नेतृत्व पुणे मनपा सायकल क्लबचे मुख्य समन्वयक सुरेश परदेशीयांनी केले; तसेच महिला गटाचे नेतृत्व नेहा भावसार यांनी केले.
याप्रसंगी क्रीडा विभाग उपायुक्त चेतना केरुरे, अतिक्रमण विभाग उपायुक्त माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे इत्यादी अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.