पुणे : जून महिन्यात पुण्यात होणाऱ्या जी-२० बैठकीच्या नियोजनासाठी केंद्रीय पथक पुणे दौऱ्यावर आले आहे. हे पथक विविध ठिकाणांची पाहणी करून बैठकांची रूपरेषा अंतिम करणार आहे. दरम्यान, १२ ते १४ जूनदरम्यान होणाऱ्या बैठकीच्या काळात पुण्यात पालखी सोहळाही असेल, त्यामुळे ही बाब महापालिकेने केंद्रीय पथकाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
पुणे येथे जूनमध्ये होणाऱ्या जी-२० प्रतिनिधींच्या बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उपसचिव अनुपम अनिश चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. पालिका आयुक्त विक्रम कुमार, राज्याचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त ए. राजा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे वैज्ञानिक संजय कौल, लवजीत सिंग, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्सचे (एनजीईडी) मुख्य कार्यकारी अधिकारी जगमोहन कथैत, अनूज कौशल आदी उपस्थित होते.
जी-२४ची बैठक १२ ते १४ जूनदरम्यान...
पुण्यात जी-२० समूह देशांच्या इलेक्ट्रॉनिक्स गटाची येत्या १२ ते १४ जूनदरम्यान आणि शिक्षणविषयक गटाची १९ ते २१ जूनदरम्यान बैठक होणार आहे. या बैठकांची जागा, स्वरूप, रूपरेषा निश्चित करण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात आले आहे. या पथकाने मंगळवारी इलेक्ट्रॉनिक्स गटाच्या बैठकीच्या तयारीसंदर्भात बैठक घेतली. तसेच काही संभाव्य ठिकाणांची पाहणीही केली.
या बैठकीच्या काळात पुण्यात पारंपरिक पालखी सोहळाही असणार आहे. त्यामुळे शहरातील काही रस्ते बंद केले जातात. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीदेखील होऊ शकते, ही बाब केंद्रीय पथकाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे पालखी सोहळा तसेच पाऊस लक्षात घेऊन नियोजन करावे लागणार आहे.
''शिक्षण गटाच्या बैठकीसाठी सदस्य देशांचे मंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या तयारीचा आढावा व पाहणी बुधवारी केली जाणार आहे. तर यावेळी जी-२० बैठकींबरोबरच प्रदर्शन तसेच काही कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहे. -विक्रम कुमार, आयुक्त महापालिका''