पळसदेव : ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदार फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. अगदी देवाची शपथ घेण्यापासून ते गद्दारी केल्यास माझ्याशी गाठ आहे, असा निर्वाणीचा इशारा उमेदवारांकडून देण्यात येत आहे. गावकीचे राजकारण हे अतिसंवेदनशील होत असल्याचे दिसते. इतर वेळी जवळून जात असताना न बोलणारे ‘सध्या काय चाललंय, काही अडचण आहे का?’ अशी विचारणा करताना गावपुढारी, उमेदवार दिसत आहेत. त्यामुळे मतदारांचा भाव वधारला आहे.मतदारांच्या घरोघरी भेटी, पदयात्रा, वैयक्तिक संपर्क आदी माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याची घाई उमेदवारांमध्ये सुरू आहे. त्यामुळे चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची चिन्हे दिसत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन पक्षांची नेतेमंडळीही या निवडणुकांकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आपल्या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या पॅनलसाठी रसदही पुरविली जात आहे. मात्र, काही ठिकाणी पक्षांतर्गत गटबाजीतून आपल्याच पक्षाच्या दोन नेत्यांचे वेगवेगळे पॅनल असल्याने कोणाला मदत करायची, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे निवडून येईल तो आपलाच, असा पवित्रा अनेक ठिकाणी वरिष्ठ नेतेमंडळींनी घेतल्याचे दिसते.निवडणुकीचे दिवस जवळ येऊ लागल्याने उमेदवार पायात भिंगरी बांधल्यासारखे धावत आहेत. या निवडणुकीत वारेमाप खर्च होत असल्याने गावकीच्या निवडणुका लाखाच्या घरात जाऊन पोहोचल्या आहेत. पैसे खर्चूनही गद्दारी केल्यास माझ्याशी गाठ आहे, असा निर्वाणीचा इशाराही मतदारांना देण्यात येत आहे. (वार्ताहर)
ग्रामपंचायत निवडणुकांत ‘फोडाफोडी’!
By admin | Published: July 29, 2015 12:11 AM