पुणे : माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंग यांची अॅन्जीओग्राफी झाल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना २५ जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.सुधीर प्रल्हाद ढवळे (रा. सारनाथ टॉवर बुध्दनगर, गोवंडी, मुंबई), रोना विल्सन (रा. नवी दिल्ली), शोमा सेन (रा. नागपूर) आणि महेश सीताराम राऊत (रा़ पिंपळरोड, नागपूर. मूळ रा. लाखापूर, जि. चंद्रपूर) यांच्या पोलीस कोठडीत यापूर्वीच २१ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.गडलिंग यांच्यावर ससून रूग्णालयात अॅन्जिओग्राफी करण्यात आली. रोना विल्सन आणि गडलिंग हे प्रतिबंधित सीपीआय माओवादी या संघटनेसाठी काम करतात याबाबतचे पुरावे उपलब्ध असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. अटक केल्यापासून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा तपास करण्यात आला नसून तपास करणे गरजेचे असल्याचे जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सांगितले. बचाव पक्षाचे वकील शाहिद अख्तर, अॅड. सिद्धार्थ पाटील, अॅड. राहुल देशमुख यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. गडलिंग हे अटक केल्यापासून तब्बल ४८ तास पोलिसांच्या ताब्यात होते. त्यांच्याकडे तपास करण्यात आला असून आणखी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तीवाद केला़ न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
गडलिंग यांना २५ जूनपर्यंत कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 4:30 AM