पुणे : ‘गदिमा प्रतिष्ठान’तर्फे देण्यात येणारा ‘गदिमा स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी दिली. तर गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार प्रिया बेर्डे यांना देण्यात येईल. या वेळी इतर पुरस्कारही घोषित केले.साहित्य, चित्रपट, कलाक्षेत्रामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा असा हा पुरस्कार आहे. गदिमा यांचा १४ डिसेंबर हा स्मृतीदिन असतो. दरवर्षी गदिमा प्रतिष्ठानतर्फे ‘गदिमा स्मती सोहळा होतो. त्यामध्ये पुरस्कार प्रदान केला जातो. आशा काळे यांनी ३० वर्षे चित्रपटसृष्टी गाजवली. तसेच नाटक, मालिका यामध्येही त्यांनी कार्य केले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एकवीस हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप आहे.मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या प्रिया बेर्डे यांना गृहिणी सखी सचिव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर ३२ वर्षांपासून नव्या उभारीच्या प्रतिभावंतांना स्फूर्तीदायक ठरलेल्या चैत्रबन पुरस्काराचे मानकरी आहेत गीतकार क्षितिज पटवर्धन. विद्या प्रज्ञा पुरस्काराच्या मानकरी गायिका मनीषा निश्चल आहेत. तसेच ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी यांचा विशेष सत्कार होणार आहे. पुरस्कार प्रदान सोहळा १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता टिळम स्मारक मंदिर येथे होईल. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे असतील.
गदिमा पुरस्कार अभिनेत्री आशा काळे यांना जाहीर
By श्रीकिशन काळे | Published: November 29, 2024 3:26 PM