पुणे: राम गणेश गडकरी यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. मात्र, त्यांचे मराठी वाङ्ममयातील कार्य महान आहे. त्यांचे कार्य साहित्याच्या माध्यमातून पुढे आणले पाहिजे. राम गणेश गडकरी यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु दगडा-विटांच्या स्मारका अगोदर त्यांचे शब्दांचे स्मारक उभे करायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले. लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी संपादित केलेल्या 'साहित्यातील राजहंस राम गणेश गडकरी' या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. रमणलाल शहा, पत्रकार स्वप्नील पोरे, विश्वास वसेकर ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, शिरीष चिटणीस, शिल्पा चिटणीस यावेळी उपस्थित होते. हर्डीकर म्हणाले, गडकरींचे मराठीतील साहित्य अत्यंत मोलाचे आहे. गडकरी हेच ख ऱ्या अर्थाने मराठी नाटकाचे मूळ मालक आहेत. गडकरींचे सगळे आयाम ज्याने घेतले, असा दुसरा नाटककार नाही, म्हणूनच मराठीतील शेक्सपियर अशा शब्दात गडक-यांची नोंद घेतली जाते. ’साहित्यातील राजहंस राम गणेश गडकरी’ हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे असून अशा पुस्तकांमुळे मराठी समीक्षेचा परिप्रेक्ष बदलणार आहे. गोविंदाग्रज केशवसूत आणि बालकवी हे पुण्यामध्ये राहत होते. विसाव्या शतकातील या सर्वच कवी लेखकांवर नव्याने समीक्षा होण्याची आवश्यकता आहे. चिटणीस यांच्याकडे नव्या समीक्षकांची चांगली टीम तयार असून, त्यांनी हे आव्हान स्वीकारून अशी अनेक पुस्तके मराठी समीक्षेत निर्माण करावीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिटणीस यांनी केले. यावेळी लेखक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी उद्धव कानडे यांनी केले.
गडकरींचे दगड-विटांपेक्षा शब्दांचे स्मारक उभे करायला हवे : विनय हर्डीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 8:15 PM
गडकरींचे मराठीतील साहित्य अत्यंत मोलाचे
ठळक मुद्दे 'साहित्यातील राजहंस राम गणेश गडकरी' पुस्तक प्रकाशन