पुणे - गुजरातमधील बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात हे संमेलन रंगणार आहे.बडोदानगरीत १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मराठी साहित्य संमेलन होत आहे. मात्र, या संमेलनाचे स्थळ जाहीर करण्यात आले नव्हते. संमेलन शहरात नेमके कोठे होणार, याची बडोदावासीयांसह तमाम मराठी साहित्यरसिकांना उत्सुकता होती. नुकत्याच मराठी वाङ्मय परिषदेच्या झालेल्या बैठकीत संमेलनस्थळ निश्चित करण्यात आले.मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा बडोद्यातील गायकवाड विद्यापीठात शिकण्यासाठी येणाºया बहुभाषिक विद्यार्थ्यांना लाभ होईल, असे मत सिनेट सदस्यांनी मांडले होते. त्यावर सविस्तरपणे सकारात्मक चर्चाही झाली. मात्र, संमेलनस्थळाची घोषणा करण्यापूर्वीच राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर झाली. आचारसंहिता लागू झाल्याने व विषय समितीसमोर मांडण्यात आलेल्या ठरावाला अंतिम मंजुरी मिळणे बाकी असल्याने संमेलनस्थळाची घोषणा आयोजकांना करता आली नसल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर, कार्यवाहक वनिता ठाकूर आणि आशिष जोशी यांनी दिली.दरम्यान, सिनेट समितीची २९ डिसेंबरला बैठक झाली. त्यात विद्यापीठात संमेलन आयोजिण्याबाबत सर्वसंमतीने ठराव मंजूर करण्यात आला. विद्यापीठात संमेलन आयोजिल्याने या कार्यक्रमावरील जवळपास ६० टक्के खर्च वाचू शकणार आहे. याशिवाय विद्यापीठ मध्यवर्ती ठिकाणी असल्याने शहरातील मराठीसह गुजराती भाषिकांनाही सहज पोहोचणे शक्य असल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख संजय बच्छाव यांनी दिली.संमेलनाच्या स्वागताध्यक्षा श्रीमंत राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विषय समितीची १८ आॅक्टोबरला रोजी बैठक झाली होती. यात विद्यापीठाच्या सिनेट समितीच्या सदस्यांसह १८ जणांचा सहभाग होता. मराठी साहित्य संमेलन विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजिण्यात यावे, असा प्रस्ताव विद्यापीठाच्याच सिनेट सदस्यांनी मांडला.
बडोद्यातील संंमेलन रंगणार गायकवाड विद्यापीठात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 3:28 AM