पिंपरी : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शहराजवळील गहुंजे क्रिकेट स्टेडिअम सज्ज झाले आहे. येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्याच्या दोन दिवस अगोदरच क्रिकेटप्रेमींनी तिकिटासाठी रांगा लावल्या होत्या. देहूरोडजवळ ‘पुणे- मुंबई एक्सप्रेस वे’च्या शेजारी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम आहे. आयपीएल स्पर्धेच्या साखळीतील तीन सामने येथे होत आहेत. तिन्ही सामने किंग्ज इलेव्हन पंजाब संघासोबत आहेत. त्यांतील पहिला सामना शुक्रवारी (दि.१०) राजस्थान रॉयल्स संघाबरोबर आहे. त्याची तिकीट विक्री सुरू असून, बुधवारी तिकीट खरेदीसाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. संपूर्ण स्टेडिअम नवरीप्रमाणे सजविण्यात आले आहे. ठिकठिकाणी झेंडे, संघाच्या नावाचे फ्लेक्स, खेळाडूंची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. स्टेडिअम परिसरात रोषणाई केली आहे. परिसरात फ्लेक्स लावण्याचे काम वेगात होते. स्टेडिअमच्या दर्शनी आणि डाव्या बाजूकडील गहुंजे गावात वाहनतळ बनविण्याचे काम सुरू होते. त्यासाठी जागेचे सपाटीकरण केले जात होते. तेथे प्रकाश व्यवस्थेसाठी हॅलोजन लावले आहेत. स्टेडिअमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील बाजूस मंडप टाकण्यात आला आहे. वाहनतळ आणि विविध प्रवेशद्वारांकडे जाणारे मार्ग दर्शविणारे जागोजागी लावले जात होते. तसेच ठिकठिकाणी मार्किंग करण्यात येत होते. गहुंजे गावातील रस्ते प्रशस्त केले असले, तरी पूर्णपणे डांबरीकरण झालेले नाही. तसेच, मामुर्डीतील रस्ते अरुंद असल्याने सामन्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. शेकडोच्या संख्येने देहूरोडच्या बाजूने मामुर्डीमार्गे वाहने येतात. हा रस्ता खूपच अपुरा पडतो. सामना सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर ही कोंडी नेहमी होते. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
आजच्या सामन्यासाठी गहुंजे नटले
By admin | Published: April 10, 2015 5:38 AM