लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सुनेचा छळ करणे, आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून तिच्यावर अघोरी विद्येचा प्रयोग करणे. तसेच खंडणी मागण्यासह, जिवे मारण्याची धमकी देणे, बेकायदा जमीन बळकावणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील प्रतिष्ठित गायकवाड कुटुंबातील बाप-लेकासह तिघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला.
या प्रकरणात नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (वय ७०), नंदा नानासाहेब गायकवाड (वय ६५) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा. एनएसजी हाऊस, औंध) यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोक्कानुसार दोनदा कारवाई झालेले गायकवाड बाप-लेक फरार झाले होते. पुणे पोलिसांनी त्यांना बुधवारी (दि. १९) कर्नाटक येथून अटक केली आहे. त्यानंतर बाप-लेकासह नंदा यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. याबाबत उषा पोपट काटे (वय ३२, रा. पिंपळे-सौदागर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीचा उल्लेख ‘रिमांड रिपोर्ट’मध्ये करण्यात आला आहे. पैसे दिल्यानंतर आरोपी मुद्दल बँकेत जमा करायला लावत. तर व्याज हे अवैधरीत्या रोखीने स्वीकारत. व्याज देण्यास उशीर केला तर आरोपी कर्जदाराकडून कोरे स्टॅप आणि कोऱ्या कागदावर ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ बनवून घेत. त्यानंतर कर्ज घेतलेल्या व्यक्तीची मालमत्ता खरेदी करीत किंवा बळकावत. सर्व आरोपी संघटितपणे काम करीत असून नानासाहेब गायकवाड या टोळीचा प्रमुख आहे. कर्जदारांचे अपहरण करणे किंवा बंदुकीचा धाक दाखवून गोळीबार केल्याचे प्रकार आरोपींनी केले आहेत. त्यानुसार आरोपींनी फिर्यादी व इतरांकडून जबरदस्तीने घेतलेले स्टॅम्प पेपर, सह्या घेतलेले पेपर हस्तगत करायचे आहेत. आरोपींनी सावकारीतून मिळवलेल्या संपत्तीचा तपास करायचा आहे. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यासाठी तसेच या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला.
गायकवाड यांच्यावर राजकीय वैमनस्यातून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या सुनेचे सासरच्यांबरोबर पटत नव्हते. व्यावसायिक असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे, असा युक्तिवाद गायकवाड यांच्यावतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी केला. आरोपींकडून पोलिसांनी ७३ लाख रुपये जप्त केले आहेत. मूळ फिर्यादीतर्फे पुष्कर दुर्गे आणि ॲड. सचिन झाल्टे-पाटील कामकाज पाहात आहेत. सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
चौकट
स्टॉलधारकाकडूनही उकळली खंडणी
आरोपी नानासाहेब गायकवाड याच्या सांगण्यावरून औंध, बाणेर येथील सार्वजनिक पदपथाची जागा स्वत:च्या मालकीची असल्याचे भासवून स्टॉलधारकांकडून भाड्याच्या स्वरूपात खंडणी वसूल केल्याची माहिती प्राप्त मिळाली असून, त्या दृष्टीनेही तपास करायचा असल्याचे न्यायालयास सांगण्यात आले.