नारायणगाव : आमदार शरद सोनवणे, शिवसेनेच्या आशाताई बुचके, राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके, काँग्रेस आयचे सत्यशील शेरकर या चारही प्रमुख नेत्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असलेल्या धालेवाडी-सावरगाव गटाची निवडणूक ही सर्वांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरली आहे़ या गटात काँग्रेसचे सत्यशील शेरकर यांचे वर्चस्व आहे़ तर हा गट पारंपरिकदृष्ट्या आशाताई बुचके यांचा आहे़ त्यामुळे या गटात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पुनर्रचनेपूर्वी हा गट येणेरे-आगार असा होता़ पुनर्रचनेमध्ये हा गट धालेवाडी-सावरगाव असा झाला़ या गटातील काही गावे काँग्रेसचे सत्यशील शेरकर यांना मानणारी आहेत. त्यामुळे काँगे्रसच्या दृष्टीने हा गट प्रतिष्ठेचा आहे़ तसेच या गटातील बहुतांश गावांवर शिवसेनेच्या आशाताई बुचके यांचे वर्चस्व असल्याने व सलग दोन वेळा त्या याच गटातून निवडून आल्याने हा गट त्यांचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो़ हा गट सर्वसाधारण जागेसाठी आल्याने आशाताई बुचके यांनी आपला बालेकिल्ला सोडून नारायणगाव गटातून उमेदवारी घेतली आहे़ या गटात शिवसेनेच्या वतीने गुलाब पारखे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अरुण पारखे, भाजपातर्फे सूर्यकांत ढोले आणि काँग्रेसतर्फे सचिन हाडवळे व आपला माणूस आपली आघाडी यांच्या वतीने नीलेश चव्हाण अशी पंचरंगी लढत होणार आहे़ तर धालेवाडीतर्फे हवेली गण हा सर्वसाधारण असून या गणात काँग्रेसकडून उदया भोपे, राष्ट्रवादीकडून बाळासाहेब विधाटे, शिवसेनेकडून धोंडिभाऊ मोरे, भाजपाकडून विशाल थोरवे, आपला माणूस आपली आघाडीतर्फे खंडू वायकर, सावरगाव हा सर्वसाधारण स्त्री राखीव असून गणात काँग्रेसकडून अर्चना भुजबळ, राष्ट्रवादीकडून वीणा घोगरे, शिवसेनेकडून ललिता चव्हाण, भाजपाकडून संजीवनी रोकडे, आपला माणूस आपली आघाडीतर्फे पूनम मनसुख अशी लढत होणार आहे़ धालेवाडी-सावरगाव गटातील सर्वच उमेदवार प्रबळ असल्याने या गटाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे़ या गटामध्ये शिवसेना व काँग्रेसचे वर्चस्व असले तरी आपला माणूस आपली आघाडीचे उमेदवार नीलेश चव्हाण यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे़ हा गट शिवसेनेकडून काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे प्रयत्नशील आहेत़ सर्व पक्षाच्या नेत्यांनी या गटात आपली ताकद लावल्याने या गटातील लढत रंगतदार झाली आहे़ सर्वच उमदेवार आपण विजयी होणार, असे सांगत असले तरी या गटातील निवडणूक कोणात्याही पक्षाला एकतर्फी राहणार नाही. गटाच्या पुनर्रचनेमध्ये नव्याने समाविष्ट झालेली गावे लक्षात घेता कोणत्याही पक्षाला एकतर्फी झुकते माप मिळणार नाही़ या गटात आमदार सोनवणे यांच्यासह आशाताई बुचके, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर या प्रमुख मान्यवरांनी हा गट आपल्या ताब्यात घेण्यासाठी जिवाचे रान करण्यास सुरुवात केली आहे़ मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)
दिग्गजांची प्रतिष्ठा लागली पणाला
By admin | Published: February 17, 2017 4:22 AM