वाघोली : गायरान व शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास सांगूनही दाद दिली जात नसल्याने अखेर वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या ६ जणांविरोधात लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.वाघोली येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण बऱ्याच प्रमाणात वाढत आहे. अनेक ग्रामस्थांनी यापूर्वी वेळोवेळी या अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे हितसंबंध जोडले गेले असल्याने कारवाईमध्ये दिरंगाई होत होती. कारवाई होत नसल्याने मागील काही वर्षांमध्ये अनेक नागरिकांनी पक्की बांधकामे शासकीय व गायरान जमिनीवर उभारून व्यावसायिक गाळे उभारले आहेत. हे गाळे भाड्याने देऊन जोरदार कमाईदेखील केली जात आहे. वाढणाऱ्या अतिक्रमणाचा ठपका ग्रामपंचायतीवर ठेवला जात असल्याने हे नव्याने होणारे अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न ग्रामपंचायत करीत असून, अनेक नागरिकांना तोंडी, लेखी नोटिसा दिल्या गेल्या आहेत. ग्रामपंचायतीने वारंवार सांगूनही अतिक्रमण काढले जात नाही. अखेर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत फिर्याद देण्याचे ठरविण्यात आले. ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम ५२, ५३ नुसार ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते यांनी सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार गायरान गट क्रमांक ११२३ व १२९ मध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे.(वार्ताहर)
गायरान जमिनीवर अतिक्रमण
By admin | Published: April 24, 2017 5:02 AM