लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकींची चोरी कारणाऱ्या तीन सराईतांना गजाआड करण्यात हडपसर पोलिसांना यश मिळाले. त्यांच्याकडून १० दुचाकी, एक रिक्षा असा ४ लाख ३० हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
महेश लक्ष्मण धुमाळ (वय २३, रा. आंबेगाव, दौंड), प्रतीक संदीप काळे (वय २१, रा. केडगाव, दौंड) आणि महेश दिलीप जगताप (वय २३, रा. कडेठाण, दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हडपसर पोलिसांचे एक पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी ससाणेनगर परिसरात एकजण विनाक्रमांकाच्या दुचाकी घेऊन थांबला असल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, अविनाश गोसावी यांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दोन साथीदार दुचाकीची चोरी करण्यासाठी गेले असल्याचे सांगितले. त्या दोघांनाही पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांच्याकडून चोरीच्या १० दुचाकी व एक रिक्षा हस्तगत केली. हडपसर, चिखली, हातवळण (दौंड), भारती विद्यापीठ, लोणी कंद परिसरातून वाहने चोरल्याची या तिघांनीही कबुली दिली. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, अकबर शेख, शाहिद शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, प्रशांत टोणपे यांनी केली.