पुणे : पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणा-याला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील ओगलेवाडी येथे ही कारवाई केली.
मोहन अंबादास शितोळे (वय ५१, रा. मेढा ज्ञानेश्वर हॉटेलजवळ, ता. जवळी, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शितोळे हा जोगता असून देवाच्या नावावर भिक्षा मागून गुजराण करतो. पाटील यांना फोन करून ''''''''जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस'''''''' अशी धमकी देण्यात आली होती. या प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. शितोळे याने मागील शनिवारी पाटील यांच्या मोबाईलवर फोन करून ''''''''मी सातारा जिल्ह्यातून लबाडे बोलत असून, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस. अन्यथा पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू.'''''''' अशी धमकी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली.
त्याच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्स काढल्यानंतर पोलिसांना शितोळेच्या पहिल्या पत्नीचा सुगावा लागला. तिच्याकडे तपास केल्यावर शितोळेची दोन लग्न झाल्याचे समोर आले. पहिल्या पत्नीकडून त्याचे पाच ते सहा मोबाईल क्रमांक मिळाले. या मोबाईल क्रमांकांचा तांत्रिकदृष्ट्या तपास केला. यातील एका नंबरच्या लोकेशनवरून पोलिसांनी आरोपीला कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथून ताब्यात घेतले. त्याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
-----
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी शितोळेकडे सहा सिमकार्ड आणि दोन मोबाईल मिळून आले आहेत. तो सिमकार्ड बदलून फोन करीत असल्याचेही समोर आले आहे.
------
महिला उमेदवाराला थेट धमकी आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन अटक केली. मी पुणे पोलिसांची आणि पोलीस आयुक्तांची आभारी आहे. पोलिसांच्या कारवाईने समाजात चांगला संदेश गेला आहे. अशा प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजेत.
- रुपाली पाटील, पुणे पदवीधर उमेदवार, मनसे