पुणे : जिल्हाधिकारी असल्याची बतावणी तसेच शासकीय भूखंड, नोकरी मिळवून देण्याचे आमिषाने फसवणूक करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी गजाआड केले. महिलेने बतावणी करून अनेकांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अनिता देवानंद भिसे (वय ४६) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. भिसे येरवडा भागातील प्रतीकनगर सोसायटीत भाड्याने सदनिका घेऊन राहत होती. याच सोसायटीत दुर्गेश्वरी चित्तर राहायला आहेत. भिसेने सोसायटीत जिल्हाधिकारी असल्याची बतावणी केली होती. चित्तर दाम्पत्याबरोबर तिने ओळख वाढविली. शासकीय भूखंड अल्प दरात मिळवून देते, असे आमिष तिने चित्तर दाम्पत्याला दाखविले होते. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी २७ लाख ५० हजार रुपये उकळले होते. भिसेने त्यांना भूखंड मिळवून दिला नाही. चित्तर दाम्पत्याने तिच्याकडे विचारणा केली. तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.
फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. तपासात भिसेने अनेकांना गंडा घातल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिच्या घराची झडती घेतली. तिच्या घरातून बनावट शासकीय शिक्के, कागदपत्रे जप्त करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, गुन्हे शाखेतील निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक समीर करपे, हनुमंत भोसले, दत्ता शिंदे, गणेश वाघ आदींनी ही कारवाई केली.