पुणे : गुन्हयाच्या पुढील तपासासाठी आरोपींना अटक करणे गरजेचे आहे, असा सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद मान्य करीत न्यायालयाने तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. पी. अदोणे यांनी हा आदेश दिला.
गजानन ऊर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय ४८, रा. शास्त्रीनगर), रूपेश कृष्णराव मारणे (वय ३८), सुनील नामदेव बनसोडे (वय ४०, दोघेही रा. कोथरूड), श्रीकांत संभाजी पवार (वय ३४), गणेश नामदेव हुंडारे (३९), प्रदीप दत्तात्रेय कंधारे (वय ३६), बापू श्रीमंत बागल (वय ३४), अनंता ज्ञानोबा कदम (वय ३७), सचिन अप्पा ताकवले (वय ३२) आणि संतोष शेलार अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. मारणे याच्या जामिनाला सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
दरम्यान, या आरोपींवर हिंजवडी पोलिस ठाण्यात देखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात देखील अटकपूर्व जामिनाचा अर्ज देखील फेटाळण्यात आला आहे. समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोपींनी रॅली काढली. रॅलीचे चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर व्हायरल केले. आरोपींनी चार जिल्ह्यातील जमावबंदीचे आदेश धुडकावले आहेत. मारणे व त्याचा साथीदारांना नोटीस देऊनही ते हजर झालेले नाहीत. या गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार करण्यासाठी त्यांना कोणी पैसे पुरवले याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना अटक करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद जामिनाला विरोध करताना अँड. कावेडिया यांनी केला.-----------------------------------------------------------------------