पुणे : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यानंतर अजून तरी नवा अध्यक्ष काँग्रेसला मिळालेला नाही. अशा परिस्थितीत पुण्यातल्या एका उच्चशिक्षीत तरुणाने गांधी यांची जागा घेण्याची तयारी दाखवली आहे. इतकेच नव्हे तर तो त्याचा अर्ज उद्या पुणे शहराचे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्याकडे देणार आहे. या तरुणाचे नाव आहे गजानंद होसाळे.
भाजपच्या झंझावातापुढे सध्या तरी देशाला काँग्रेसला अच्छे दिन नाहीत. अशा परिस्थितीत अध्यक्ष असलेल्या गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळे कार्यकर्तेच नव्हे तर नेतेही निराश झाले आहेत. त्यांची अनेकदा मनधरणी करूनही त्यांनी अध्यक्षपद सोडण्याचा इरादा बदलेला नाही. अखेर काँग्रेसकडून वेगवेगळ्या नावांवर चर्चा सुरु झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार,गांधी यांच्यामते अध्यक्ष पदासाठी तरुण, तडफदार आणि उच्चशिक्षीत व्यक्तीला प्राधान्य असणार आहे. या सर्व निकषात पुण्यातील गजानंद बसतो.
गजानंदचे मूळगाव उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आहे. त्याने बिदर इथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. तो पुण्यात एका कंपनीत काम करतो. त्याला घरची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसून गावाकडे त्याचे वडील शेती करतात.
तो याबद्दल म्हणतो की, 'कार्यकर्ता किंवा नेता होण्यापेक्षा थेट अध्यक्ष झालो तर अंमलबजावणी करताना मला कमी अडचणी येतील. गरिबी हटावो सारख्या घोषणांवर प्रत्यक्ष काम करण्याचा विचार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही त्याला काम करायचे आहे. मला माझ्या विचारांवर काम करायचे आहे. मी माझे विचार त्यांच्यासमोर ठेवेन. शेवटी निर्णय काहीही झाला तरी माझे ध्येय मला देशात चांगला बदल घडवणे हेच आहे.