लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ज्या गाडीतून मारणे हात उंचावून लोकांना नमस्कार करत होता. ती गाडी पुरविणाऱ्याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. कोथरूड पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत ७ गाड्या जप्त केल्या असून इतर गाड्यांचा शोध सुरू आहे.
गजानन मारणे याच्या मिरवणुकीसाठी वडगाव शेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नारायण गलांडे यांची आलिशान गाडीत बसून गजानन मारणे याची मिरवणूक काढण्यात आली होती. ही माहिती मिळाल्यावर कोथरूड पोलिसांनी गलांडे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल दळवी यांनी ही गाडी आपल्याकडून कामासाठी मागून नेली होती, असा जबाब दिला. त्यानंतर राहुल दळवी यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात राहुल दळवी यांना अटक केली असून आतापर्यंत ७ गाड्या जप्त करण्यात आल्या असल्याचे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी सांगितले.
गजानन मारणे व त्याचे समर्थक हे अटकेच्या भीतीने फरार झाले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूडमधील गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाल्यानंतर वारजे पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटकेची टांगती तलवार मारणे टोळीवर होती. त्यामुळे ते सर्व जण फरार झाले आहेत.
याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेले आरोपी अटकेच्या भीतीने फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी वारजे माळवाडी पोलीस ठाणे, कोथरूड व गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. आरोपी ज्या ठिकाणी लपून बसले असतील, अशा ठिकाणी अचानक वेळी अवेळी छापामारी करण्यात येत असून सर्व आराेपींच्या घरझडत्या घेण्यात येत आहेत. तसेच तांत्रिक विश्लेषण पथकाच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. या आरोपींना आसरा देणारे तसेच या कृत्यास मदत करणा-या लोकांची माहिती काढण्यात येत असून अशा लोकांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. आरोपींच्या जंगम व स्थावर मालमत्ता बँक खाती यांची माहिती घेण्याचे काम सुरू झाले असून हे आरोपी मुदतीत मिळाले नाही तर या आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे जाहीरनामे काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.