पुणे : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने विश्रामबाग परिसरात एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पाेलिसांनी जुगार अड्ड्याच्या मालकासह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच जुगार खेळण्याचे साहित्य, २५ हजारांची रोकड आणि ८ मोबाइल असा १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, विश्रामबाग परिसरात एका खोलीत जुगार खेळला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. त्या वेळी तेथे १० जण पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले. जुगार अड्ड्याचा मालकासह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील दोघेजण पसार झाले आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अजय राणे, अण्णा माने, तुषार भिवरकर, संदीप कोळगे, आदींनी ही कारवाई केली.