लोकमत न्यूज नेटवर्क
शहरातील १ हजार ९४० महिला पोलीस अंमलदारांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : घरातील वृद्ध सासू-सासरे, लहान मुलांची शाळा, अभ्यास, स्वयंपाकपाणी हे सर्व व्याप संभाळून धावपळ करीत ड्युटीवर हजर राहावे लागत असे. त्यात अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना केवळ ८ तास ड्युटी असताना पोलिसांना १२ तास ड्युटी करावी लागते. घरी आणि नोकरी अशा दोन्ही आघाड्यांवर जबाबदारीचा सामना करताना किमान महिलांना तरी ८ तास ड्युटी असावी, असा आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी नुकताच दिला. त्यानुसार आता शहर पोलीस दलात सोमवारपासून ८ तासांची ड्युटीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे आता महिला पोलीस अंमलदारांना आपल्या घराकडे अधिक वेळ देता येणार आहे.
पुणे शहर पोलीस दलातही सोमवारपासून सर्व महिला पोलीस अंमलदार यांना ८ तासांची ड्युटी देण्यात येणार आहे. तसे आदेश पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहेत. शहर पोलीस दलात १ हजार ९४० महिला पोलीस अंमलदार आहेत. या निर्णयाचा या सर्वांना फायदा होणार आहे.
..
मला एक वर्षाचे लहान बाळ आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असून राहायला लोणी काळभोर येथे आहे. प्रवासात जाण्या-येण्यात खूप वेळ जातो. शिवाय १२ तासांऐवजी ८ तासांचे कर्तव्य झाल्यामुळे बाळाला वेळ देता येणार आहे. खूप आनंद झाला आहे.
-स्वाती वेठेकर, महिला पोलीस अंमलदार
......
शासनाचा हा निर्णय खूप चांगला आहे. आम्ही दोघेही पती-पत्नी पोलीस खात्यात असल्याने ८ वर्षांच्या मुलाला वेळ देऊ शकत नव्हतो. ड्युटीतील ४ तास कमी झाल्याने आता ताण पण कमी होईल. मुलाला अधिक वेळ देता येईल.
जयश्री भालेराव, महिला पोलीस अंमलदार
......
प्रथमच असा निर्णय झाला आहे. आम्ही महिला पोलीस म्हणून या निर्णयाचे स्वागत करतो. ड्युटीतील ४ तास कमी झाल्याने घरच्यांना वेळ देता येईल. आई वयोवृद्ध आहे. तिला वेळ देता येईल. कामावरील ताण कमी होऊन उत्साह वाढेल.
-अश्विनी केकान, सामाजिक सुरक्षा विभाग
..........