पुणे: ढोल ताशांचा गजर, नगारावादान अन् बाप्पा मोरयाचा जयघोष करत उत्साही वातावरणात पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. रमणबाग पथकाच्या वादानानंतर मानाचा पहिला श्री कसबा गणपती लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ झाला.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. रमणबाग बरोबरच रुद्रगर्जना आणि कलावंत ही ढोल पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. त्यामगोमागोच मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ झाला. गंधर्व बँड, ताल, शिवमुद्रा आणि समर्थ प्रतिष्ठान ही ढोल पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. यंदा दोन्ही मानाच्या गणपतींनी वेळेत मिरवणुकीला सुरवात केली.
यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. पुण्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. समाधान चौकात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. पारंपरिक वेशभूषेतील महिला, लहान मुले लक्षवेधी ठरत आहेत. मानाच्या गणपती मंडळात ध्वजपथकांचे खेळ हे विशेष आकर्षण ठरले आहे. तरुणी आणि महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
यंदाची मिरवणूक धुमधडाक्यात होणार आहे. कार्यकर्त्यांबरोबर पुणेकरही उत्साहात विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. बाप्पाला निरोप देताना राज्यावरचे सर्व विघ्न टळो. अशी आम्ही प्रार्थना केली आहे.
- पुनीत बालन