पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...’चा जयघोष अन् ढोलताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांचे शनिवारी (दि. ७) पुणेकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. पारंपरिक वाद्यांचा नाद अन् आकर्षक मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाचे पाचही गणपती अतिशय दिमाखात विराजमान झाले. दगडूशेठ गणराय सिंह रथातून, तर त्रि-शूल डमरू रथातून शारदा गजाननाची मिरवणूक काढण्यात आली. तर शहरात सर्वत्र मंगलमय वातावरणात घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. याप्रसंगी वरूणराजानेही हलक्या सरींची बरसात करून बाप्पांचे स्वागत केले.
शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे आणि घरोघरी गणेशोत्सव उत्साहात सुरू झाला आहे. गणेशभक्तांना सकाळपासूनच गणरायाच्या आगमनाची उत्सुकता होती. लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच स्टाॅल्सवर गर्दी झाली होती. स्टॉल्सवर आरती करून प्रत्येक जण आपल्या घरी गणराय घेऊन जात होते. सर्वत्र ‘मोरया मोरया’चा गजर निनादत होता. मंगलमय वातावरणात भाविकांनी आपापल्या घरी बाप्पांची प्रतिष्ठापना केली, तर सार्वजनिक मंडळांनी वाजतगाजत गणरायाची प्रतिष्ठापना केली. अनेक मंडळांच्या मिरवणूक जल्लोषात झाल्या.
मानाचा पहिला : कसबा गणपती
मानाचा पहिला कसबा गणपतीची मूर्ती सकाळी रास्ता पेठेतील मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांच्याकडून पालखीत बसविण्यात आली. तिथून मिरवणूक थेट कसबा पेठेत आणली आणि त्यानंतर विधिवत श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. संघर्ष ढोल-ताशा पथक, श्रीराम पथक, शौर्य पथकांनी आपली कला सादर केली. चांदीच्या पालखीत पारंपरिक मिरवणुकीने बाप्पा मंडपात विराजमान झाले. कन्हेरी मठाचे (कोल्हापूर) श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अष्टविनायकमधील सिद्धटेक गणपतीचा देखावा गाभाऱ्यात केला आहे. यंदा महिला सुरक्षिततेचे अभियान राबविले जात आहे. गणेशोत्सवात १ लाख २१ हजार भाविकांना आम्ही ‘स्त्री शक्तीचा सन्मान करा,’ अशी शपथ देत आहोत, अशी माहिती मंडळाचे श्रीकांत शेटे यांनी दिली.
मानाचा दुसरा : तांबडी जाेगेश्वरी गणपती
श्री तांबडी जाेगेश्वरी या मानाचा दुसऱ्या गणपती मंडळाचे हे १३२ वे वर्षे आहे. ‘श्रीं’चा आगमन सोहळा पारंपरिक पद्धतीने झाला. सकाळी मिरवणूक नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून निघाली आणि कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे ती उत्सव मंडपात पोहचली. मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅण्ड, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल पथक, विष्णूनाद शंख पथकांनी आपली सेवा दिली. चांदीच्या पालखीत विराजमान श्री जोगेश्वरी गजानन मंडपात दिमाखात बसले. दुपारी सनई-चौघड्याच्या कर्णमधुर साथीत श्रींची प्राणप्रतिष्ठापना आचार्य प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज (कोषाध्यक्ष - श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या) यांच्या हस्ते झाली, अशी माहिती मंडळाचे प्रशांत टिकार यांनी दिली.
मानाचा तिसरा : गुरुजी तालीम गणपती
पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’च्या आगमनाची मिरवणूक सकाळी निघाली. मिरवणूक गुरुजी तालीम गणपती मंदिर - गणपती चौक - लिंबराज महाराज चौक - अप्पा बळवंत चौक - जोगेश्वरी चौक - गणपती चौक आणि गुरुजी तालीम मंडळ उत्सव मंडपात आली. मिरवणुकीत सहभागी ढोल-ताशा पथक जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बॅण्ड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक, रुद्रांग ढोल-ताशा पथक, आवर्तन ढोल-ताशा पथकांनी आपली सेवा दिली. तर स्वप्निल सरपाले व सुभाष सरपाले यांनी बनविलेल्या फुलांच्या गज रथातून श्रींचे आगमन झाले. श्रींची प्राणप्रतिष्ठापना उद्योजक पुनीत बालन व जान्हवी धारिवाल-बालन यांच्या शुभ हस्ते झाली. यंदा संपूर्ण फायबर ग्लासमध्ये बनविलेल्या आकर्षक ‘गज महल’मध्ये बाप्पा विराजमान झाले, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी दिली.
मानाचा चौथा : तुळशीबाग गणपती
तुळशीबाग गणपती मंडळाने यावर्षी ओडिशा पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरातील गर्भगृह आणि भव्य प्रवेशद्वाराची सजावट करण्यात आली आहे. सजावटीचे उद्घाटन उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते झाले. पेशवेकालीन श्रीराम मंदिरापासून प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखीतून पूजेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक काढली. मिरवणुकीत अग्रभागी लोणकर बंधूंचा नगारा, शिवगर्जना आणि विघ्नहर्ता ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. मिरवणूक गणपती चौक लक्ष्मी रस्त्याने नगरकर तालीम चौकातून उजवीकडे अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, बेलबाग चौक, लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकातून तुळशीबागेतील उत्सव मंडपापर्यंत काढण्यात आली. दुपारी उत्सव मंडपात श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सपत्नीक पूजा केली. तसेच मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित आणि तुळशीबाग येथील व्यापारी वर्गाची उपस्थिती होती.
मानाचा पाचवा : केसरीवाडा गणपती
मानाचा पाचवा केसरीवाडा गणेशाची प्रतिष्ठापनेची मिरवणूक सकाळी ९:३० वाजता रमणबाग चौकातून निघाली. प्रथेनुसार पालखीतून मिरवणूक काढली. मिरवणुकीत गंधाक्ष व श्रीराम ढोल ताशा पथक होते. यावेळी बिडवे बंधू यांचे नगारावादन झाले. प्रतिष्ठापना रोणक रोहित टिळक यांच्या हस्ते ११:४५ वाजता झाली. केसरी ट्रस्टचे विश्वस्त डाॅ. दीपक टिळक, डाॅ. गीताली टिळक, रोहित टिळक, डाॅ. प्रणोती टिळक यांची उपस्थिती होती.
फुलांचा भाव वधारला...
बाप्पाला बसण्यासाठी घरोघरी आरास करण्यात आली. आरतीसाठी फुले, हार यांसाठी फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्यामुळे फुलांना चांगलाच भाव आला. यामुळे गणपती आगमनाच्या पहिल्याच दिवशी चांगला व्यवसाय झाल्याने फुल-विक्रेतेही आनंदी होते. एरव्ही २० रुपयांना मिळणाऱ्या फुलांच्या हाराची किंमत दुपटीने-तिपटीने वाढली होती.
रस्त्यांवरील कोंडी गायब !
शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असल्याने सकाळपासूनच रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी पहायला मिळाली. प्रत्येकाच्या घरी गणरायाचे स्वागत होत असल्याने बहुसंख्य नागरिक घरीच होते. त्यामुळे शहरात कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही. बऱ्याच वर्षांनी वाहतूक कमी झाल्याचा अनुभव पुणेकरांना आला.