अतुल चिंचली- पुणे : दगडूशेठच्या बाप्पासाठी आम्ही वर्षानुवर्षे काम करत आहोत. बाप्पाची सेवा करण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. दगडूशेठच्या देखाव्यासाठी काम केले आहे, हे सांगितल्यावर अनेक कामाच्या संधी चालून येतात. या दोन, तीन महिन्याच्या कामातून आम्हाला वर्षभराची ऊर्जा मिळते, अशा भावना श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या देखाव्यासाठी काम करणाऱ्या कामगारांनी व्यक्त केल्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती यंदा गणेशोत्सवात श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात येणार आहे. उंच शिखरे, मंडप असलेले हे सूर्यमंदिर ओडिशा राज्यातील विश्वप्रसिद्ध प्राचीन आश्चर्य ठरलेल्या कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित आहे. सारसबागेजवळील बाबूराव सणस मैदानासमोरील सजावट विभागात सजावटीचे काम सुरु झाले असून अनेक कारगीर याकरिता दिवसरात्र काम करीत आहेत.जूनपासून या देखाव्याच्या कामाला सुरुवात होते. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ( अनंत चतुर्दशी ) कामगार कार्यरत असतात. दगडूशेठचा देखावा, रथ, मंदिराच्या आवारातील सजावट, लायटिंग सर्व काही हे कामगार करतात. कारपेंटर, पेंटिंग, आणि लाईटिंग अशा तीन विभागात हे कामगार काम करतात. बाप्पासाठी गेली पंचवीस ते तीस वर्षे झाले काम करत आहेत. शिल्पकार विवेक खटावकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही विभागातून पन्नास ये साठ कामगार कार्यरत आहेत. पेंटिंग विभागातील कामगारांचे नेतृत्व राजस्थानचे राजाराम प्रजापत करत होते. आता त्यांच्या पाठोपाठ पुत्र सुनील प्रजापत यांनी नेतृत्व करण्यास पुढाकार घेतला आहे. प्रजापत यांच्याबरोबर काम करणारे सर्व पेंटर राजस्थान येथील जोधपूर शहरात राहतात. .....सुनील प्रजापत म्हणाले, आमच्याकडे सद्य:स्थितीला पंधरा पेंटर कामाला आहेत. यापैकी काही जणांना तीस, तर काही जणांना १५ वर्षांचा अनुभव आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच आम्ही या कामाची वाट बघत असतो. कुठलाही कामगार कंटाळा न करता अतिशय उत्साहाने या कामात सहभागी होतो. दरवर्षी भारतातील विविध मंदिरांची प्रतिकृती साकारली जाते. काम करण्यास उत्साह दरवर्षी वाढत जातो. कारपेंटर विभागात तीस ते पस्तीस कामगार कार्यरत आहेत. सर्व कारागीर कोकण, उस्मानाबाद, विदर्भ अशा ठिकाणाहून आले आहेत.....कारपेंटर कामगारांनी सांगितले की, आम्ही बाप्पाच्या सेवेसाठी वर्षानुवर्षे काम करत आहोत. देखाव्याच्या कमानी, मूर्ती तयार केल्या जातात. यासाठी तिन्ही विभाग एकमेकांना मदत करत असतात. लाकडी पिलर, कमानी उभारून चालत नाही. तर त्यावर उत्तम नक्षीकाम आणि पेंटिंग केल्यावर ते शोभून दिसतात. .....लाईट विभागात आठ कामगार कार्यरत आहेत. मंदिर प्रतिकृती, मिरवणूक रथ, तसेच प्रतिकृतीच्या आजूबाजूची सर्व लायटिंग हे करतात. दरवर्षी दगडूशेठ गणपतीची लायटिंगची जबाबदारी शाम वाईकर घेतात.