लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फ्लॅट भाड्याने देण्याची जाहिरात संकेतस्थळावर दिल्यानंतर लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या सायबर चोरट्याने ५० हजार रुपयांना गंडा घातला.
याप्रकरणी सुबोध लोणकर (वय २४, रा. धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
लोणकर यांच्या वडिलांचा कळस भागात फ्लॅट आहे. फ्लॅट भाडेतत्त्वावर देण्याची जाहिरात लोणकर यांनी एका संकेतस्थळावर टाकली होती. त्यानंतर चोरट्याने लोणकर यांच्या आईच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. लष्करात अधिकारी असल्याची बतावणी चोरट्याने केले. पुण्यात नेमणूक झाली असून विश्रांतवाडी भागात फ्लॅट भाडेतत्वावर घ्यायचा आहे, अशी बतावणी चोरट्याने केली.
त्यानंतर चोरट्याने फ्लॅटचे छायाचित्र पाठविण्यास सांगितले. फ्लॅटच्या व्यवहारातील पैसे ऑनलाइन पाठवितो, अशी बतावणी त्याने केली. लोणकर यांच्या आईने याबाबतची माहिती लोणकर यांना दिली. लोणकर यांना अॅपद्वारे खात्यावर एक रुपया पाठविण्यास चोरट्याने सांगितले. त्यानंतर चोरट्याने लोणकर यांचे खात्यातून दोनवेळा ऑनलाइन व्यवहार करून प्रत्येकी २५ हजार रुपये लांबविले. लोणकर यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे तपास करत आहेत.