पुणे : नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका महिलेला साडेचार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला हडपसर परिसरातील गोपाळपट्टी येथे राहायला आहेत. मे महिन्यात महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. घरातून काम करा आणि दरमहा आकर्षक वेतन मिळवा, असे संदेशात म्हटले होते. महिलेने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. ऑनलाइन पद्धतीने काम करण्यासाठी काही प्रक्रिया पार पाडावी लागेल, असे चोरट्यांनी महिलेला सांगितले. कंपनीची मेंबरशिप मिळवून देण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी वेळोवेळी चार लाख ५७ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक राजू अडागळे तपास करत आहेत.