पुणे : महात्मा गांधींच्या काळात हिंदू समाज हा धर्मांध नव्हता. हिंदू महासभेचे हे दुर्दैव होते की त्यांच्याबरोबर हिंदू कधीच नव्हते. मोदींनाही अधिक मते मिळू शकली नाहीत. सध्याचा हिंदू त्यांच्याकडे वळायला ‘गांधी आणि नेहरू’ यांना मरावे लागल्याची खंत ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली.साधना प्रकाशनाच्या वतीने सुरेश द्वादशीवार लिखित ‘जवाहरलाल नेहरू' पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते झाले. यावेळी अतुल देऊळगावकर आणि विनोद शिरसाठ यांनी द्वादशीवार यांची मुलाखत घेतली. आज समाजात मोठ्या प्रमाणावर ‘गांधी आणि नेहरू’ या द्वयींवर यथेच्छ टीका केली जाते. गांधी नसले तरी त्यांच्याविषयीचा द्वेष अद्यापही संपलेला नाही. एकवेळ रेडिओ अथवा सोशल मीडियावर बंदी घालता येऊ शकते पण ‘नेहरू मुसलमान होते’ अशा त्यांच्याविषयीच्या ज्या गोष्टी अत्यंत विश्वासाने सांगितल्या जातात त्या कानाफुसीवर कोण बंधन आणणार? असा सवाल द्वादशीवार यांनी उपस्थित केला.काश्मीर प्रश्न नेहरूंनी नव्हे, तर राजा हरिसिंहने निर्माण केला.१४ महिने युद्ध झाले पण आपले लष्कर पाकिस्तानी सेना मागे हटवू शकले नाही. हे नेहरूंचे नव्हे, लष्कराचे अपयश आहे, याकडे द्वादशीवार यांनी लक्ष वेधले. हेमंत गोखले यांनी अध्यक्षीय भाषणात पुस्तकाविषयी विस्तृत विवेचन केले.
...त्यासाठी गांधी-नेहरूंना मरावे लागले : द्वादशीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 4:59 AM