पुणे : महात्मा गांधी यांच्या 71 व्या पुण्यतिथीनिमत्त देशभरातून गांधीजींना आदरांजली वाहण्यात येत असताना तिकडे अलिगडमध्ये संतापजनक प्रकार पाहावयास मिळाला. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी विकृतीचा कळस गाठत गांधीजींच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गाेळ्या झाडल्या. तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहन करुन नशुराम गाेडसे अमर रहें च्या घाेषणा दिल्या. याचे प्रतिसाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देखील उमटले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल रात्री उशीरा एकत्र येत हिंदू महासभेचा निषेध केला. तसेच गांधी हा विचार आहे. ताे गाेळीने कधीही मरणार नाही असेही यावेळी ठणकावून सांगण्यात आले.
अलीगड येथे हिंदू महासभेने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शौर्य दिवस साजरा केला. यावेळी हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय हिने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर पिस्तुलामधून गोळ्या झाडल्या. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच यावेळी नथुराम गोडसेच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण केला. तसेच मिठाई वाटण्यात आली. महात्मा नथुराम गोडसे अमर रहेच्या घोषणाही दिल्या गेल्या. ''महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणे योग्य नाही. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती.''असे संतापजनक वक्तव्यही पूजा शकून पांडेय हिने केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही गाेष्ट पाेहचताच त्यांनी विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीन येथे निषेध सभा घेतली. त्यात हिंदू महासभेचा निषेध करण्यात आला. मनुवाद मुर्दाबाद, गांधी तेरे सपनाे काे हम मंजील तक पहुचाऐंगे, नथुराम मुर्दाबाद, गांधी हम शर्मींदा है, तेरे कातिल जिंदा हैं. अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच गांधीजींच्या छायाचित्रांचे फलक देखील हातात धरण्यात आले हाेते.