महात्मा गांधींना आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. आगाखान यांचे मूळ नाव सुलतान महंमद शहा. ते भारतीय राजकारणातील पुढारी होते. ‘आगाखान’ ही पदवी त्यांना ब्रिटिशांनी बहाल केली होती. इ.स. १९०० साली भारतात मोठा दुष्काळ पडला होता. त्या वेळी अनेकांनी मदत, दानधर्म केले. आगाखान यांनी लोकांना रोजगार मिळावा, यासाठी महाल बांधला. ते स्वत: या महालात काही काळ वास्तव्यासही होते. गांधीजींना स्थानबद्ध केले तेव्हा आगाखान पॅलेस ही जागा पडकी आणि दुर्लक्षित होती. ८ आॅगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी तेथे आले. त्यांचे सचिव महादेव देसाई हेही सोबत होते. गांधींच्या कार्याचा दस्तावेज तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. काही काळाने कस्तुरबा गांधीही तेथे वास्तव्यास आल्या. गांधींजींच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या दुर्दैवी घटना येथे घडल्या. १५ आॅगस्ट १९४२ रोजी महादेव देसाई यांचे आगाखान महालातच निधन झाले. २२ फेब्रुवारी १९४४ रोजी कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले. दोघांचीही समाधी तिथे बांधण्यात आलेली आहे.
महात्मा गांधींनी आगाखान पॅलेस येथून शासनाशी पत्रव्यवहारही केला, अनेकांशी संपर्क साधला. स्थानबद्ध करण्यात आले असले तरी महत्त्वाचे राजकीय नेते असल्यामुळे त्यांना पत्रव्यवहाराची सवलत देण्यात आली होती. त्या काळात देशभरात ‘भारत छोडो आंदोलन’ सुरू होते. सर्वसामान्य जनतेचे उठाव केला, काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. मात्र, कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचवायची नाही, हे सूत्र लोकांनी पाळले. महाराष्ट्रात पत्री सरकार अर्थात प्रतिसरकार स्थापन झाले होते. स्थानबध्दतेच्या शेवटच्या काळात गांधीजींना मलेरिया झाला होता. त्यांची प्रकृती खालावली, त्यांना अन्नही जात नव्हते. या परिस्थितीत गांधीजींचे निधन झाल्यास जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल, याची ब्रिटिशांना भीती वाटत होती. गांधीजींच्या अंत्यविधीची तयारीही करण्यात आली होती, असे सांगितले जाते. २२ एप्रिल १९४४ रोजी गांधीजींना स्थानबध्दतेतून मुक्त करण्यात आले. स्वातंत्र्यचळवळीच्या शेवटच्या टप्प्यात फाळणी, संविधान अशा अनेक घटनांची चर्चा सुरु होती आणि महात्मा गांधी या सर्व घटनांमध्ये केंद्रस्थानी होते. गांधीजींच्या आगाखान पॅलेसमधील वास्तव्यावर आधारित ‘कारावास की कहानी’ हे पुस्तक सुशिला नय्यर यांनी लिहिले आहे. शोभना रानगडे यांनी त्याचा मराठीत अनुवाद केला.
आगाखान यांना धर्मगुरू मानणाऱ्या पंथाच्या कुटुंबात माझा जन्म झाला. त्यामुळे लहानपणापासून मला आगाखान पॅलेसचे आकर्षण होते. १९६८-६९ साली आणि त्यानंतरही मी अनेकदा सायकलवर आगाखान पॅलेसमध्ये जायचो. आगाखान पॅलेस १९६९ मध्ये आगाखान यांचे नातू यांच्या उपस्थितीत सरकारला अर्पण करण्यात आले. आगाखान यांच्याबद्दल मनात आदर असला तरी श्रद्धा नाही. मात्र, या वास्तूविषयी आणि गांधीजींच्या आठवणींविषयी अपार ममत्व आहे. मासूम संस्थेच्या शिबिरांच्या निमित्ताने या वास्तूत राहण्याचीही संधी मिळाली. सोलापूरच्या माया बडनोरे यांनी लिहिलेल्या ‘कस्तुरबा’ या पुस्तकाचे प्रकाशन शोभना रानडेंच्या उपस्थितीत आगाखान पॅलेस येथे झाले. ‘कारावास की कहानी’ यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही येथे झाले. २००७ मध्ये मला विधायक कार्यकर्ता पुरस्कार मोहन धारिया यांच्या हस्ते याच वास्तूत मिळाला होता. आगाखान पॅलेस ही गांधीविचारांनी काम करणाऱ्यांसाठी प्रेरणा आहे.
ब्रिटिशांना देशाबाहेर घालवणे एवढेच गांधीजींच्या नेतृत्वाखालील चळवळीचे उद्दिष्ट नव्हते. गांधीजींना समता, समानतेवर, प्रेमावर आधारित आधुनिक भारत निर्माण करायचा होता. सर्वधर्मसमभाव ही त्यांची विचारधारा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी आचरणही केले. गांधीजींची सर्वधर्मीय प्रार्थनाही आगाखान पॅलेसमध्ये उपलब्ध आहे. उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित लोकांसाठी काम करणे आणि धर्म, जातीच्या आधारावर राजकारण करणाऱ्या राजकारण्यांचा मुकाबला गांधी विचारांनी करणे, हेच आपले उद्दिष्ट असायला हवे.
- अन्वर राजन